आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi On Congress And UPA Govt. In Mumbai

‘यूपीए’कडून लोकशाही संस्था मोडीत - नरेंद्र मोदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनमानी पद्धतीने कारभार करता यावा यासाठी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार लोकशाही संस्था उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईत केला. विनय सहस्रबुद्धे यांच्या ‘बियाँड अ बिलियन बॅलट्स’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.

‘सीबीआय’कडून आयबी अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली जातेय. नियोजन आयोगापेक्षा केंद्रीय सल्लागार समितीला महत्त्व आले आहे. अशा प्रकारे यूपीए सरकार लोकशाही संस्थाच मोडीत काढत आहे. केंद्रातील यूपीए सरकार जय-पराजयाच्या गर्तेत अडकले आहे. भारतीय लोकशाहीचे कौतुक करून दोष लोकशाहीत नसून नीती आणि नेतृत्वात असल्याचे मोदी म्हणाले. शासनकर्ते हे राज्यकर्ते नसून सेवक आहेत याचाच गांधी घराण्याला विसर पडला आहे. 50 वर्षांत देशाची सत्ता गांधी कुटुंबाभोवती फिरत राहिली. एका कुटुंबाच्या हाती सत्ता केंद्रित न होता ती लोकशाही संस्थांच्या हाती हवी, अशी अपेक्षाही या वेळी मोदींनी व्यक्त केली. या कार्यक्रमास नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. मतपेटीमधून पुस्तक बाहेर काढून मोदी यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. दलाल स्ट्रीटवरील मुंबई शेअर बाजार इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

मोदींच्या तोंडी गांधीजींची वचने
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची अनेक नीतीवचने सांगितली. गांधी यांची विश्वस्त संकल्पना, रामराज्य तसेच आदर्श कारभार याचेही गुणगाण त्यांनी केले. मात्र, गांधींच्या पाईकांनाच रामराज्य संकल्पनेत जमातवाद दिसतो, त्याला आम्ही काय करणार ? असा टोलाही त्यांनी कॉँग्रेसला लगावला.

मुंडेंची खासदारकी आठ कोटींत !
मी 1981 मध्ये पहिल्यांदा आमदार झालो. त्या वेळी मला 29 हजार रुपये निवडणूक खर्च आला होता. त्यातील 23 हजार पक्षाने दिले होते. यावेळच्या निवडणुकीसाठी मात्र मला 8 कोटी खर्च आला, असा गौप्यस्फोट गोपीनाथ मुंडे यांनी केला. राजकारणातील पैशाचा वापर थांबवण्यासाठी उमेदवारांना शासकीय तिजोरीतून पैसे मिळावेत, अशी मागणीही त्यांनी केली.