आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: CMच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची PM ने घेतली गंभीर दखल, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्र्यांना घेऊन उडालेले हेलिकाॅप्टर विद्युत तारेला लागून काही मिनिटांतच खाली काेसळले हाेते. - Divya Marathi
मुख्यमंत्र्यांना घेऊन उडालेले हेलिकाॅप्टर विद्युत तारेला लागून काही मिनिटांतच खाली काेसळले हाेते.
मुंबई- २५ मे रोजी लातूर येथून मुंबईला येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघाताची डीजीसीएने उच्चस्तरीय चौकशी सुरू असून चौकशीला साधारणतः तीन ते चार महिने लागणार आहेत. यासोबतच आता शुक्रवारी अलिबाग येथे झालेल्या हेलिकॉप्टर टेक ऑफ प्रकरणाचीही चौकशी सुरू केली जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
 
२५ मे रोजी लातूर येथे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने टेकऑफ घेताच क्रॅश लँडिंग केले. या अपघातात मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेले अधिकारी सुदैवाने बचावले. या अपघातानंतर डीजीसीएने चार अधिकाऱ्यांमार्फत अपघाताची चौकशी सुरू केली आहे. यापैकी दोन अधिकारी दिल्लीचे असून दोन अधिकारी पश्चिम विभागाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताची गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असे निर्देश दिल्याचे समजते.

याबाबत माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले, हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी साधारणत: दोन ते अडीच महिने लागतात. मात्र, लातूर अपघात मुख्यमंत्र्यांशी संबंधित असल्याने याची सविस्तर सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या चौकशीला तीन ते चार महिने लागतील. चौकशी पूर्ण होईपर्यंत हेलिकॉप्टरच्या दोन्ही पायलटना उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हेलिपॅड कुठे असावे, याचे स्पष्ट नियम असताना नियमांचे उल्लंघन केले जाते. याबाबतही काटेकोरपणे नियम पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अलिबाग प्रकरणाचीही होणार चौकशी   
अलिबाग प्रकरणाचीही चौकशी करणार का, असे विचारता अधिकाऱ्याने सांगितले, अलिबाग येथे शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे हेलिकॉप्टरमध्ये बसत असतानाच इंजिन सुरू असल्याने हवेमुळे हेलिकॉप्टर थोडे पुढे गेले. हेलिकॉप्टर पुढे सरकल्याने मुख्यमंत्री मागे धावले, अन्यथा अपघात झाला असता. हेलिकॉप्टर आणखी पुढे गेले असते तर चिखलात अडकण्याची शक्यता असल्याने पायलटने टेक ऑफ केले आणि नंतर पुन्हा लँडिंग केले, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र, या प्रकरणाचीही सखोल चौकशी करण्यात येणार असून यासाठी डीजीसीए दुसरी समिती नेमेल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, निलंग्यातील हेलिकॉप्टर अपघात...
बातम्या आणखी आहेत...