आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र माेदींचा अादेश धुडकावून भाजपात नेत्यांच्या नातलगांना उमेदवारी(महाकौल)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपल्या कुटुंब कबिल्यासाठी पक्ष चालवू नका,’ हे पंतप्रधान नरेंद्र माेदींचे अादेश धुडकावून लावून मुंबईमधील भाजपच्या नेत्यांनी महापालिका निवडणुकीसाठी लॉबिंग करत अापल्या मुलांना, पत्नीला, नातेवाइकांना उमेदवारी मिळवून दिली. खासदार किरीट सोमय्या, राज्यमंत्री विद्या ठाकूर, अामदार राज पुरोहित, भाई गिरकर, पराग अळवणी, प्रवीण दरेकर, अमित साटम, कॅप्टन सेल्वम अादींनी इतर इच्छुकांचा पत्ता साफ करत अापल्याच घरात तिकीट खेचून अाणले. 
 
सोमय्या यांचे चिरंजीव नील यांना भाजपने मुलूंडमधून उमेदवारी दिली. मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांनी आपला मुलगा आकाशला कुलाब्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे पती जयप्रकाश ठाकूर हे मुंबईतील वजनदार नेते. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचे विश्वासू असलेल्या जयप्रकाश यांनी आपले चिरंजीव दीपक यांना कांदिवलीतून तिकीट मिळवले अाहे.
 
 आमदार भाई गिरकर यांच्या पत्नी शैलजा यांना तर आमदार पराग अळवणी यांनीही आपल्या सौभाग्यवती ज्योती यांची उमेदवारी कायम राहील याची काळजी घेतली अाहे. पक्षाचे उपाध्यक्ष अामदार प्रवीण दरेकर यांनी अापले बंधू प्रकाश यांना तिकीट मिळवून दिले. तर स्वत: मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलारही दुसऱ्यांदा तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले अाहेत. आमदार कॅप्टन सेल्वम यांचे भाऊ मुरूगन यांना तिकीट मिळाले. आमदार अमित साटम यांनी मेव्हणे रोहन राठाेड यांना तिकीट मिळवून दिले असून शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या, पण भाजपच्या चिन्हावर आमदार झालेल्या भारती लव्हेकर यांंनीही आपले भाचे योगीराज दाभाळकर यांना तिकीट मिळवून दिले.
 
काम करणाऱ्यांनाच तिकिटे : शेलार 
भाजपने त्यांची मुले नातेवाईक असा निकष तिकिटे देताना लावण्यात आलेला नाही. त्यांचे काम पाहून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, अशी सारवासारव मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. 
 
२२ वर्षे काम, तरी डावलले 
मी गेली २२ वर्षे पक्षात काम करत आहे. परंतु काही विशेष लाेकांसाठी भाजपने निष्ठावंतांना डावलले. ज्यांना कुणी अाेळखत नाहीत अशा रोहन राठोड यांना तिकीट मिळाले. अामदार अमित साटम यांचे मेव्हणे एवढीच राठाेड यांची अाेळख असल्याची संतप्त प्रतिक्रिया अंधेरी वर्सोवातील ज्येष्ठ कार्यकर्ते फुलचंद उबाळे यांनी व्यक्त केली.