आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi\'s Speech In Vortan Business School Cancelled

अमेरिकेतील व्हॉर्टन बिझनेस स्कूलमधील नरेंद्र मोदींचे भाषण रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/अहमदाबाद/वॉशिंग्टन - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण रद्द करण्याचा निर्णय अमेरिकेतील व्हॉर्टन बिझनेस स्कूलने घेतल्यानंतर सोमवारी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिवसेना नेते सुरेश प्रभू तसेच उद्योगपती गौतम अदानी यांनी निर्णयाचा निषेध करत परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला. विशेष म्हणजे अदानी परिषदेचे प्रायोजक आहेत.

मोदी 23 मार्च रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण करणार होते. मात्र, स्कूलमधील प्रमुख प्रोफेसर व विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे भाषण रद्द करण्यात आले. यावर सुरेश प्रभू म्हणाले, ‘मोदींना स्वत: व्हॉर्टन स्कूलने निमंत्रित केले होते. त्यांनाच बोलवावे असा हट्ट स्वत: मोदींनी कुणाकडे धरला नव्हता. मनात आले म्हणून त्यांचे भाषण रद्द करणे हा एकट्याचा नव्हे, देशाचा अपमान आहे.’

दरम्यान, या निर्णयामुळे व्हॉर्टन इकॉनॉमिक फोरमचेच अधिक नुकसान होईल, असे भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले. यापूर्वी मार्च 2005 मध्ये गुजरात दंगलीत त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे कारण देऊन अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला. दरम्यान, अदानी समूहाच्या प्रवक्त्यानुसार समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी परिषदेत सहभागी न होण्याचे ठरवले आहे. कार्यक्रमाच्या प्रायोजकत्वाची जबाबदारी मात्र कंपनी पार पाडणार आहे.

मोदींना जागतिक प्रमाणपत्राची गरज नाही : भाजप
अमेरिकेत मोदींचे भाषण रद्द केल्याच्या प्रकाराला फार महत्त्व दिले जाऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. मोदींना भारतीय जनतेची मान्यता असायला हवी. यासाठी आंतरराष्‍ट्रीय प्रमाणपत्राची गरज नाही, असे पक्षप्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी म्हटले आहे.
हा तर देशाचा अपमान
शिवसेना नेते व माजी खासदार सुरेश प्रभू यांचे व्हॉर्टन इंडिया इकॉनॉमिक परिषदेमध्ये प्रास्ताविक भाषण होणार होते. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींचे होणारे भाषण रद्द करण्यात आल्याने प्रभू यांनीही आपला नियोजित दौरा रद्द करून एक प्रकारे मोदींना पाठिंबा दर्शवला. हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर देशाचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अदानी मुख्य प्रायोजक
व्हॉर्टन बिझनेस स्कूलमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या इकॉनॉमिक फोरमचे मुख्य प्रायोजकत्व अदानी ग्रुपकडे आहे. स्वत: प्रायोजक असतानाही अदानी समूहाचे अधक्ष गौतम अदानी यांनीही परिषदेवर बहिष्कार टाकत हा समूह मोदींच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले.
देवरा, माँटेकसिंग यांचाही सहभाग
भारत केंद्रस्थानी ठेवून पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाशी सलग्न व्हॉर्टन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या परिषेदत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया आणि माहिती-प्रसारण राज्यमंत्री मिलिंद देवरा सहभागी होत आहेत. याशिवाय अभिनेत्री शबाना आझमी तसेच गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहतील.
मुस्लिमांची हरकत नाही
देशाने मोदींना पंतप्रधानपदी निवडल्यास मुस्लिमांचा आक्षेप असण्याचे कारण नाही, असे दारूल उलूम देवबंदचे माजी कुलगुरू गुलाम मोहम्मद वस्तानवींनी म्हटले आहे. मोदींची स्तुती केल्याने 2011 मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, हे विशेष.