आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव: डिफर्ड पेमेंटमधून 250 कोटींचे रस्ते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने सिंहस्थापूर्वीची कामे होण्यासाठी प्रशासनाने डिफर्ड पेमेंटमधून (प्रलंबित देयक योजना) 250 कोटींची मुख्य रस्त्याची कामे प्रस्तावित केली आहेत. अर्थात, यासंदर्भात प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर होणे महासभेवर अवलंबून आहे.

आगामी सिंहस्थाच्या दृष्टीने वाहतूक नियोजन करण्यासाठी मुख्य, अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी महापालिकेने आराखड्यात 857 कोटींची रक्कम अंदाजित केली आहे. आराखडा राज्य शासनाकडे पाठवलेला असला तरी शासनाकडून नेमका किती निधी मिळणार याविषयी कोणताही अंदाज नसल्याने सिंहस्थासाठी कराव्या लागणार्‍या रस्त्यांच्या कामासाठी पालिकेने 200 कोटींच्या कर्ज प्रस्तावाबरोबरच प्रलंबित देयक योजनेअंतर्गत कामे प्रस्तावित केली आहेत. यासंदर्भात महापौर अँड. यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, स्थायीचे सभापती उद्धव निमसे आणि सर्व गटनेत्यांच्या बैठकीत या कामासाठी आवश्यक निधीविषयी चर्चा झाली. त्यात प्रलंबित देयक योजनेअंतर्गत कामे हाती घेण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

तिजोरीवर ताण येणार नाही
‘डिफर्ड पेमेंट’अंतर्गत पालिकेला रस्ता कामासाठी दिलेल्या मुदतीच्या दोन वर्षांनंतर पुढील पाच वर्षांत देयके टप्प्या-टप्प्याने दिली जाणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण येणार नाही. त्यानुसार 250 कोटींच्या कामांना महासभेने मान्यता दिली तर ही कामे होऊ शकतील. संजय खंदारे, आयुक्त, महापालिका

प्रस्तावित आतील व बाह्य रिंगरोडची कामे
> लेखानगर-राजसारथी-वडाळागाव-विजय ममता जंक्शन-टाकळीगाव, टाकळीगाव-संगम ब्रिज-औरंगाबादरोड-अमृतधाम-गुंजाळमळा-मेरी-मखमलाबादरोड-क्रांतिनगर-इंद्रप्रस्थ पूल-जुना गंगापूरनाका चौपदरीकरण, एबीबी सर्कल- सिटी सेंटर मॉल-मनोहरनगर-लेखानगर : एकूण 20.3 किलोमीटर : आर्थिक तरतूद 145 कोटी.
> त्र्यंबकरोड मजबुतीकरण आणि दुचाकीसाठी मार्ग. 8.05 किलोमीटरसाठी 25 कोटी.
> दिंडोरीरोड-निमाणी जंक्शन ते पालिका हद्दीपर्यंत प्रस्तावित 7.80 किलोमीटर रस्त्यासाठी 38 कोटी.
> पेठरोड-कॅनॉलपासून पालिका हद्दीपर्यंत 6.6 किलोमीटरसाठी 41 कोटी रुपये.
> गंगापूररोड-जेहान सर्कल ते गंगापूरगाव आठ किलोमीटरसाठी 40 कोटी.
> अंबड लिंकरोड-पपय्या नर्सरी ते गरवारे जंक्शन 5.4 किलोमीटरसाठी 22 कोटी.
> पाथर्डीफाटा-पाथर्डीगाव-वडनेर गेटपर्यंतच्या सहा किलोमीटर रस्ता सुधारणेसाठी 15 कोटी.
> नांदूरपूल, नांदूरनाका ते हॉटेल जत्रापर्यंतचा 3.5 किलोमीटर रस्ता; गोदावरीस संत जनार्दन पुलास समांतर पूल बांधण्यास 21 कोटी.
> गंगापूररोड बारदान फाटा ते शिवाजीनगर ते कार्बन कॉर्पोरेशन ते त्र्यंबकरोड अमृत गार्डन रस्ता 5.2 किलोमीटरसाठी 15 कोटी.
> औरंगाबादरोड ते लक्ष्मीनारायण मंदिर तपोवन ते विजय ममता थिएटर पुणे महामार्गापर्यंतच्या 3.5 किलोमीटरसाठी 37 कोटी.
> तपोवन साधुग्राम-औरंगाबादरोड आग्रा महामार्ग-आतील रिंगरोड ते मध्य रिंगरोडला जोडणार्‍या 2.8 किलोमीटरसाठी 15 कोटी.
> एकूण 77.15 किलोमीटर रस्ता. 414 कोटी रुपये खर्च.
> कामांची मुदत दोन वर्षे, त्यानंतर पुढील पाच वर्षांत देयके दिली जाणार.