आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nation Pays Homage To BR Ambedkar On His 122nd Birth Anniversary

वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणा : राज्यपाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दलित, ग्रामीण आणि अल्पसंख्य समाजालाही जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचे लाभ मिळायला हवेत. त्यासाठी त्यांना कौशल्यावरील आधारित शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणा, असा परखड सल्ला राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी रविवारी राज्य सरकारला दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी स्मारक टपाल तिकिटाचे अनावरण चैत्यभूमीवरील एका कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

दीक्षा भूमी आणि चैत्यभूमी ही प्रेरणादायी स्मारके महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. दलितांनी स्वत:ची दलित चेंबर्स ऑफ कॉर्मस स्थापण्यापर्यंत मारलेली मजल हे बाबासाहेबांच्या संदेशाचे फलित असल्याचे राज्यपाल म्हणाले. चैत्यभूमी स्मारक टपाल तिकीट जगभर समतेचा संदेश देईल, अशी आशा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. भारतात जी सदृढ लोकशाही आहे. जो सर्वसमावेशक विकास होतो आहे. त्याचे श्रेय बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत अंतभरूत केलेल्या समतेच्या विचारालाच जाते. देशाला खरीखुरी दिशा देण्याचे काम बाबासाहेबांनी राज्यघटनेद्वारे केल्याचे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.

असे आहे तिकीट
मान्यवर संस्था, व्यक्ती आणि स्मारके यांची तिकिटे टपाल खाते काढते. वर्षभरात अशी केवळ 15 नवी तिकिटे प्रकाशित होत असतात. चैत्यभूमी स्मारकाच्या पाच रुपयांच्या या टपाल तिकिटावर चैत्यभूमी स्मारक आणि बाबासाहेबांचे चित्र आकर्षक निळ्या रंगात आहे.

विचार हेच स्मारक
इंदु मिलच्या जागेवरील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेद्वारे महिनाभरात आराखडे मागवले जातील. मात्र दगड, मातीच्या स्मारकापेक्षा विचार हेच बाबासाहेबांचे चिरंतन स्मारक आहे, अशी खोचक टीपण्णी मुख्यमंत्र्यांनी केली.