आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Krushi Vima Yojana, Maharashtra\'s Farmers Gets Highest Help From Center

राष्ट्रीय कृषी विमा योजनेतंर्गत राज्यातील शेतक-यांना सर्वाधिक नुकसान भरपाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील 12 जिल्ह्यात हवामान आधारीत पीक विमा योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. या जिल्ह्यातील 13 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकऱ्यांना 270 कोटी रुपयांची नुकसान भरपाई बँक खात थेट जमा करण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात सुमारे 74 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून सहभागी शेतकरी आणि मिळालेल्या नुकसान भरपाईची रक्कम ही आजपर्यंत या योजनेत मिळालेली सर्वात मोठी रक्कम ठरलेली आहे. या योजनेच्या उपयुक्ततेबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान यापुढे विमा कंपन्यांशी करारनामा करताना एक निश्चित किमान रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, अशी अट घालण्यात यावी, ही रक्कम किमान 1 हजार रूपये राहावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
राष्ट्रीय कृषि विमा योजना केंद्र शासनाची मदती आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्यात राबविली जाते. राष्ट्रीय कृषि विमा योजनेमध्ये खरीप हंगाम 2014-15 मध्ये 45 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यानुसार 28 लाख हेक्टरवरील पिकांच्या विम्यासाठी केंद्र शासनाच्या कृषि विमा कंपनीकडे 176 कोटी रूपयांचा हप्ता भरलेला आहे. विमा हप्ता भरण्यासाठी राज्य शासनाकडून 25 कोटी रूपयांचे अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे विम्यात सहभागी असलेल्या 45 लाख शेतकऱ्यांपैकी 35 लाख शेतकऱ्यांना 1 हजार 600 कोटी रुपयांची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे.
सोयाबीन उत्पादक 11 लाख शेतकऱ्यांना 824 कोटी रुपये, तूर उत्पादक 5.50 लाख शेतकऱ्यांना 175 कोटी रुपये, कापूस उत्पादक 5 लाख शेतकऱ्यांना 287 कोटी रूपये आणि मूग पीक घेतलेल्या 4.50 लाख शेतकऱ्यांना 120 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. कृषि विमा संबंधीच्या धोरणानुसार जमा होणाऱ्या विमा हप्त्याच्या मर्यादेपर्यंतची नुकसान भरपाई विमा कंपनीद्वारे देण्यात येते. त्यामुळे विमा हप्त्याची जमा झालेली सुमारे 200 कोटी रक्कम वजा जाता उर्वरीत सुमारे 1 हजार 400 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईपैकी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी 700 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या 35 लाख शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईची रक्कम खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच जमा करण्याकरीता आवश्यक निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून विमा कंपनीला उपलब्ध करून दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांनी ज्या पिकांसाठी विमा काढलेला आहे, त्या सर्व पिकांसाठी नुकसान भरपाई मिळणार आहे. राष्ट्रीय कृषि विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असली तरी, राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई मिळावी यासाठी सर्वंकष पिक विमा योजना राबविण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करीत आहे.