आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्‍ट्रवादी सांगलीतील पराभवाचे करणार विश्‍लेषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सांगलीत काँग्रेसच्या दणदणीत विजयाने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या पराभवाचे वरिष्ठ नेते विश्लेषण करणार असून त्यानंतर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच या पराभवामागे स्थानिक कारणांसह ‘मोदी फॅक्टर’चा उलटा परिणामही असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते.
कॉँग्रेसने महापौर इद्रिस नायकवडी यांना फोडले, तरीही राष्ट्रवादीने ते फारसे मनावर घेतले नव्हते.

शहरातील साडेआठ ते दहा टक्के मुस्लिम समाज हा पूर्वापार राष्ट्रवादीशी इमानदार आहे. मात्र सध्या सर्वत्र नरेंद्र मोदी यांचे जे वारे वाहू लागले आहेत, त्यामुळे सांगलीतील एकवटलेल्या मुस्लिम समाजाने काँग्रेसला कौल दिल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष राष्ट्रवादीने काढला आहे. मोदी फॅक्टरचा भाजपला नव्हे तर काँग्रेसला उलटा फायदा झाला आहे. असेच होत राहिले तर नक्की कोणती व कशी रणनीती आखायची हे ठरवावे लागेल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आर. आर. पाटील व जयंत पाटील हे एरवी एकमेकांवर कुरघोडी करत असतात. यंदा मात्र त्यांनी पक्षासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, तरीही राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. मुख्यमंत्र्यांची स्वच्छ प्रतिमा काँग्रेसच्या कामी आली, असे विश्लेषण केल्यास आबांची स्वच्छ प्रतिमा का कामी आली नाही, याचा विचार राष्‍ट्रवादीला करावाच लागेल, असे एका माजी मंत्र्याने सांगितले. दरम्यान, शरद पवार या पराभवाचा आढावा घेणार आहेत.