मुंबई - राष्ट्रवादीने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात मतदारांवर आश्वासनांची खैरात केली. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप तसेच एसटी स्टँडवर २० रुपयांत सकस जेवण, औरंगाबाद, नाशिक, नागपूर येथे मोनोरेल अशा लोकप्रिय घोषणांचा यात समावेश आहे.
६५ वर्षे पूर्ण झालेल्या अल्प भूधारक, कोरडवाहू शेतकरी व शेतमजूरांना पेन्शन, ६० टक्के शेती ठिबक, तुषार सिंचनाखाली, सर्व पिकांचा समावेश असलेली कृषी कवचकुंडल विमा योजना, जीवनदायी योजनेची मर्यादा ३ लाखांवर, राज्यातील सर्व कॉलेजांमध्ये मोफत वायफाय सेवा, शाळांत डिजिटल स्मार्ट क्लासरूम्स, पोलिस कर्मचा-यांना मुंबईत हक्काची घरे अशी प्रमुख आश्वासनेही जाहीरनाम्यात आहेत.
मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाला २ हजार कोटींची तरतूद, प्रमुख शहरे विमानसेवेने जोडण्याचाही यात समावेश आहे.
अर्थसंकल्प नव्हे
‘जाहीरनामा म्हणजे अर्थसंकल्प नव्हे. जाहीरनामा म्हणजे एकप्रकारे ढोबळनामा असतो. त्यात बदल करून पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण करता येतात.’
दिलीप वळसे पाटील, जाहीरनामा प्रमुख