आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Eager To Bring Ajit Pawar In Delhi

अजितदादांना दिल्लीत धाडण्यास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री उतावीळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - खासदारांची संख्या वाढवण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी, असे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरले. त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही इतर मंत्र्यांप्रमाणे लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात यावे, अशी मागणी राष्‍ट्रवादीतील काही दादाविरोधक मंत्र्यांनी केली. यापैकीच काही मंत्र्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचेही नाव माढा मतदारसंघासाठी माध्यमांमध्ये पुढे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याप्रती निष्ठा असलेले अनेक मंत्री सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. यापैकी काही मंत्र्यांचा अजित पवार यांच्याशी नेहमी खटका उडत असतो. यापैकी काही मंत्र्यांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यामागे अजित पवारच असल्याचा आरोप हे नेते खासगीत करतात. लोकसभेची रणनीती ठरवण्यासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत काही मंत्र्यांनी लोकसभेवर जाण्यात अनुत्सुकता दाखवली तेव्हा अजित पवार यांनी खडे बोल सुनावले होते. ‘पंधरा पंधरा वर्षे मंत्रिपद भोगणा-यांचे लाड आता बंद होतील, पक्ष सांगेल तेथे निवडणूक लढवावी लागेल,’ अशा शब्दांत अजितदादांनी सुनावले, त्यामुळे ज्येष्ठ मंत्री दादांवर नाराज झाले. यातूनच मग गेली पंधरा - वीस वर्षे मंत्रिपद उपभोगणा-या अजित पवारांनीही लोकसभेसाठी उतरावे, अशी मागणी पुढे आली.
राष्‍ट्रवादीच्या बैठकीनंतर काही संभाव्य उमेदवारांची नावे माध्यमांमधून समोर आली. त्यात शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात अजित पवार किंवा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढविणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यामागे याच नाराज मंत्र्यांचा हात असल्याचेही सांगितले जाते. सुनेत्रा पवार यांना राजकारणात रस नाही. त्या सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या कामात व्यस्त असतात. मात्र काही लोक मुद्दाम त्यांचे नाव मीडियात पसरवत असल्याची नाराजी अजित पवार समर्थकांनी व्यक्त केली.
अजित पवारांवर राज्याचीच धुरा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळच्या सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, अजितदादा लोकसभा निवडणूक लढविणार नसून पक्षाची राज्यात ताकद वाढविण्याचीच जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शरद पवार यांनीही त्यांना हीच जबाबदारी पार पाडण्याचे सूतोवाच केले आहे. मात्र ही बाब माहीत असूनही आमच्याच पक्षातील नाराज मंत्री मुद्दामच अशा बातम्या पसरवत आहेत.