मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गणेश नाईक पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मात्र, त्यांनी आता भाजपऐवजी शिवसेनेत जाण्याचा निर्धार केला आहे. याबाबत कुणकुण लागताच राष्ट्रवादीनेही त्यांना ठाणे व पालघर जिल्ह्यांच्या संघटनात्मक जबाबदारीपासून दूरच ठेवले.
शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या नाईकांनी १५ वर्षे नवी मुंबईत ‘घडाळ्या’ची पकड कायम ठेवली. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत त्यांचे चिरंजीव संजीव यांना ठाण्यातून पराभव पत्करावा लागला. तर स्वत: गणेश नाईकांना बेलापूर विधानसभा मतदारसंघही गमवावा लागला. या पराभवानंतर राष्ट्रवादीपासून दूर जाणारे नाईक सुरुवातीला भाजपमध्ये जातील, असे वाटत होते. मात्र, त्यांच्या पूर्वीच्या सहकारी मंदा म्हात्रे आधीच भाजपमध्ये गेल्या असून त्यांनीच विधानसभेत नाईकांना पराभूत केले होते.
म्हात्रे यांनी भाजपमध्ये नाईकांविरोधात वातावरण तयार केले असून ते पक्षात आले तरी कुठलीही जबाबदारी देऊ नये, अशी फील्डिंग लावली होती. तसेच नवी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ते भाजपमध्ये येत असल्याने तेथील स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनीही नाईकांना विरोध केला आहे. त्याच वेळी पक्षात नव्याने येणा-यांना लगेच महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार नाही, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आल्याने नाईकांसमोर शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.
पुढे वाचा उध्दव ठाकरेही आहेत सकारात्मक