आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist, Congress Minister Fight Eachother Over The File

राज्यात फायलींवरून राष्‍ट्रीवादी, कॉंग्रेसमध्‍ये 'तू-तू मैं नाटक'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केवळ राष्‍ट्रवादी मंत्र्यांच्याच फायलींवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गप्प बसून आहेत, असे नाही तर काँग्रेस मंत्र्यांच्याही फायली ते दाबून ठेवत असल्याचा आरोप राष्‍ट्रवादीतील एका वरिष्ठ मंत्र्याने केला आहे. माजी उपमुख्यमंत्री असलेल्या या नेत्याने दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हटले की, मुख्यमंत्री दिल्लीहून राज्यावर थोपलेले आहेत. त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. आम्ही मंत्री आहोत. आम्हाला जनतेसमोर जायचे असते. जनहिताच्या फायली तुंबून राहिल्या, तर आम्ही कसे तोंड दाखवणार? एकेक फाइल तीन-तीन महिने तुंबून असते. हो-नाही असा काही निर्णय कळवला तर प्रकल्प नव्याने सादर करता येईल. परंतु तसे होत नाही, अशा शब्दांत या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात चांगले रस्ते नाहीत. तेही आम्हाला बांधता येत नाहीत. धरणे वगैरे कोण कोठे बांधतो ते कळत नाही. परंतु रस्ते तर समोर दिसतात. हे एक साधे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
शरद पवार कुशल प्रशासक आहेत. राज्यातील समस्यांची त्यांना जाण आहे. ते असे वक्तव्य करतात तेव्हा त्यामागे नक्कीच कारण असेल, असेही या मंत्र्याने म्हटले आहे.


काय रखडले?
०2000पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याचा प्रस्ताव
०लवासाच्या फाईली
०पुणे व मुंबईतील विमानतळांचे प्रकल्प


काही का होईना पण निर्णय घ्या
नियमबाह्य फायलींवर निर्णयास वेळ लागतो, असे सीएम म्हणतात. अशा फायली मंजूर होण्याची अजिबात अपेक्षा नाही. किमान, नामंजूर करण्याबाबत तरी निर्णय घ्यावा. परंतु, कसलेच निर्णय होत नसल्याचा टोला राष्‍ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला.

फायली क्लिअर होत नसल्याबद्दल काँग्रेसने राष्‍ट्रवादीलाही दोषी ठरवले आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारित असलेल्या अर्थ खात्याकडेच अनेक फायली तुंबल्या असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. अनेक प्रकरणांत वित्त विभागाने सह्याच केलेल्या नाहीत. त्यामुळे निर्णय होत नसावेत. राष्‍ट्रवादी काँग्रेसने याचा अभ्यास करावा, असा सल्लाही माणिकरावांनी दिला आहे.
अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनीही मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्री राज्याचा नेता आहे. तो विकासाचाच विचार करणार. वैयक्तिक स्वार्थ दडलेले आहेत अशा मंत्र्यांच्या फायली ते कशासाठी क्लिअर करतील, असा सवाल करतानाच लवासा, पुणे आणि मुंबई विमानतळाबाबतचे काही प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी अद्याप क्लिअर केलेले नाहीत, असेही नसीम खान यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन वर्षांत मुख्यमंत्र्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले असून त्याचा जनतेला फायदा झाला आहे. त्यामुळे ते फायलींवर सह्या करत नाहीत हे म्हणणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.