आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Ministers Not Want Delhi, But Interested In State Politics

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिल्ली नको,राज्याच्या राजकारणातच नेते घेतात अधिक रुची

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर त्याचा आपल्या पक्षाला जास्तीत जास्त फायदा मिळावा अशी रणनीती राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आखत आहेत. त्यासाठी राज्यातील राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीला उभे राहावे लागणार आहे. मात्र, मंत्र्यांना दिल्लीऐवजी राज्यातच राहण्यात जास्त रुची असल्याचे दिसून येत आहे.
1999 मध्ये स्थापना झालेल्या राष्ट्रवादीने 1999 च्या निवडणुकीत स्वबळावर सहा जागा जिंकल्या होत्या. 2004 मध्ये काँग्रेसशी युती करून नऊ जागा आणि 2009 मध्ये आठ जागा जिंकल्या होत्या. यंदा हा आकडा 20 पर्यंत नेण्याचा प्रयत्न असून 12-15 खासदार तरी निवडून आणायचेच अशी योजना पवारांनी आखली आहे. केंद्रात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या जास्त असली तर पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते असे पवारांना वाटत आहे. त्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांना ते लोकसभेच्या रिंगणात उतरवू इच्छितात. सुनील तटकरे यांच्यापासून छगन भुजबळ, बबनराव पाचपुते, जयंत पाटील, आर.आर. पाटील, जयदत्त क्षीरसागर यांसह काही मंत्र्यांना दिल्लीला पाठवले जाण्याची चर्चा आहे. मात्र हे मंत्री दिल्लीला जाण्यास उत्सुक नाहीत.
गेली 20 वर्षे मंत्रीपद भूषविणा-या राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ मंत्र्यांने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले, राज्यात आमदाराला जेवढे महत्त्व असते तेवढे दिल्लीच्या राजकारणात नसते. मोठे खाते मिळाले तरच खासदार चर्चेत राहातो. तसेच मतदारसंघातही खासदारापेक्षा आमदार, मंत्र्यांचा जास्त पगडा असतो. येथे रोजच्या रोज भेटावयास शेकडो नागरिक येतात. परंतु दिल्लीत कोणीही भेटावयास येत नाही. दिल्लीच्या राजकारणाचा म्हणावा तसा उपयोग नसल्याने दिल्लीला जाण्यास कोणी उत्सुक नसतो, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या एका वरिष्ठ मंत्र्याशी दिल्लीला जाण्याबाबत विचारता ते म्हणाले, पक्षाने तिकीट दिले तर नक्कीच जाऊ. राज्यात आपण फक्त एका ठरावीक विभागापुरते मर्यादित असतो. परंतु दिल्लीला गेल्यास तुमचे वर्तुळ रुंदावते. त्यामुळे दिल्लीला जाणे आवडेल, असेही त्याने सांगितले. काँग्रेसकडे लोकसभेसाठी उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडे उमेदवार नसल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. दिल्लीत हिंदी आणि इंग्रजीची आवश्यकता असते, मात्र राज्यातील काही मंत्री वा खासदारांना या दोन्ही भाषा येत नसल्याने त्यांना तेथे अडचण होते.