आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress News In Marathi Vijaykumar Gavit, Jitendra Avhad

राज्य मंत्रिमंडळात उद्या फेरबदल, आव्हाडांना मंत्रीपद तर फौजियांना डच्चू?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर आता राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसकडून राज्याच्या मंत्रिमंडळात उद्या (गुरुवारी) विस्तार होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले विजयकुमार गावीत यांच्या जागी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच फौजिया खान यांना डच्चू मिळणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

राजभवनामध्ये उद्या (गुरुवार) सकाळी 10 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची मा‍हिती मिळाली आहे.

मिळालेल्या मा‍हितीनुसार, भाजपने हीना गावित यांना खासदारकीची उमेदवारी दिल्यानंतर, विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर जितेंद्र आव्हाड यांची वर्णी लागणार आहे.

औरंगाबादमध्ये स्थानिक पातळीवर उमेदवाराला मदत न केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते, असा ठपका फौजिया खान यांचावर ठेवण्यात आला होता. यामुळे यांना हटवण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मंत्रिमंडळात होणार्‍या विस्तारात फौजिया खान यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सपशेल पानीपत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे यापूर्वीच संकेत दिले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाची चाहूल लागल्याने लोकसभा निकालापूर्वीच अशी शक्यता वर्तविली होती. विशेष म्हणजे पक्षबांधणीसाठी हे बदल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच काय तर कॉंग्रेसलाही पराभव टाळता आला नाही. राज्यात राष्ट्रवादीचे चार तर कॉंग्रेसला केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे.