आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Want Coordinating Meet For Important Issues

राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी राष्ट्रवादीला हवी समन्वय बैठक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात एलबीटीला होणा-या विरोधासह इतर काही महत्त्वाच्या विषयांवर काँग्रेसने समन्वय समितीची बैठक बोलवावी, अशी मागणी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केली.


केंद्र सरकारमध्ये एफडीएचा निर्णय घेण्यात आला तेव्हाही राष्ट्रवादीने समन्वय समितीच्या बैठकीची मागणी केली होती, पण अद्याप बैठक झालेली नाही. आता राज्यासमोर काही प्रश्न असून ते तातडीने सोडवण्यासाठी ही बैठक लवकरात लवकर घ्यायला हवी, असे सांगत त्यांनी काँग्रेसकडे बोट दाखवले. एलबीटीला विरोध करत सलग दुस-या दिवशीही मुंबईतील व्यापा-यांनी बंद पाळलेला असताना त्यांच्या समस्या सोडवण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. एलबीटीला आमचा विरोध नसून त्याच्या अंमलबजावणीमध्ये व्यापा-यांना येणा-या अडचणी समजून त्यावर उपाययोजना करायला हवी, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.


समस्या समजून घ्या
व्यापा-यांशी चर्चा करण्यात काय समस्या आहे, असा सवाल करत त्यांच्या एलबीटीला विरोध नसून अंमलबजावणीच्या स्वरूपाला विरोध आहे. त्यासाठीच मंत्र्यांच्या समितीची राष्ट्रवादीने मागणी केल्याचे नवाब मलिक म्हणाले.समन्वय समितीच्या बैठकीमध्ये म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या दरांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये असलेली नाराजी, भीषण दुष्काळासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचा आढावा व भविष्यातील निर्णयांवर चर्चा, महामंडळ अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या आणि जिल्हास्तरीय समित्यांबाबत चर्चा अशा काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे आवश्यक आहे, असे नवाब
मलिक यांनी सांगितले.


व्यापा-यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा
व्यापा-यांनी एलबीटीविरोधात शुक्रवारी आझाद मैदान येथे पुकारलेल्या धरणे आंदोलनाला भाजपने पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. व्हॅट लागू करताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने आश्वासन दिले होते की, आणखी कोणताही कर लागू करणार नाही, पण एलबीटी लागू करून सरकारने व्यापा-यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे नाराज व्यापा-यांनी पुकारलेल्या आंदोलनाला भाजप पाठिंबा देणार असून प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, मुंबई अध्यक्ष राज पुरोहित आदी नेते या वेळी आंदोलनामध्ये सामील होतील.