आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Want Power At State And Centre, Divya Marathi

राज्यातच नव्हे, तर केंद्रातही सत्तेत वाटा मिळवण्याचा राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'कावळा कधी बसतोय... आणि फांदी कधी तुटतेय’ या उक्तीप्रमाणेच शिवसेना- भाजपची युती कधी तुटतेय याची राष्ट्रवादी काँग्रेस वाट पाहत होती. युती तुटल्याची घोषणा होताच त्यांनीही काँग्रेसबरोबरचा १५ वर्षांचा संसार मोडत पहिला डाव खेळला. आता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यासह केंद्रातही सत्तेत वाटा मिळवण्याचा त्यांचा दुसरा प्रयत्न असेल. सत्तेविना राहू न शहणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रसंगी भाजपशीही हातमिळवणी करण्याची तयारी असल्याचा संशय राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

युती फ‍िसकटली आणि आघाडीचेही तीनतेरा वाजल्याने राज्यात आता पंचरंगी मुकाबला होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना व मनसे असे सर्व जण स्वतंत्र चुली मांडून लढणार आहेत. या घमासानीत ६२ पेक्षा जास्त जागा मिळवून सत्तेच्या जवळपास जाण्याचा निकराचा प्रयत्न करायचा, हे आता राष्ट्रवादीचे पहिले लक्ष्य असेल आणि मग निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर घोडेबाजारात उतरून सत्तेच्या जवळ जायचे, हे दुसरे उद्दिष्ट राहील. लढाईपेक्षा तहात जिंकण्यात तरबेज असणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यासाठी अगदी शेवटच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी यशस्वी बोलणी करून राज्यात तसेच केंद्रात सत्तास्थानी जाऊ शकतात, असे तर्क लावले जात आहेत.
आघाडी तुटल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भविष्यात राष्ट्रवादी भाजपबरोबर संसार मांडेल, असे भाकीत वर्तवले होते. लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आधी नरेंद्र मोदी प्रचारसभा घेणार होते. या सभेमुळे चित्र पालटेल, असा आशावाद महायुतीचे उमेदवार व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना होता, पण शेवटच्या क्षणी मोदींची ही सभा रद्द झाली. याआधी काही लाखांनी निवडून येणा-या सुप्रियांना काही हजार मतांवर समाधान मानावे लागले. मोदी आले असते, तर त्या पराभूत झाल्या असत्या, पण तसे होऊ शकले नाही, हे दुर्दैव, असा गौप्यस्फोट स्वत: जानकर यांनी केला होता. विशेष म्हणजे अमरावतीचा अपवाद वगळता मोदींनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमदेवारांविरोधात सभा घेतली नव्हती.

पवारांचा सर्वांशीच सलोखा
पवार नेहमीच समाजवाद्यांसह डावे व उजव्या पक्षांच्या नेत्यांशी कायम चांगले संबंध ठेवून असतात. मोदींशीही त्यांचे ‘मधुर’ संबंध आहेत. आता विधानसभेत भाजप सर्वाधिक जागा मिळवून एक नंबरचा पक्ष ठरल्यास आपणही ७० किंवा त्याहून अधिक जागा मिळवून भाजपशी हातमिळवणी करायची. हे करताना काँग्रेसबरोबर केलेले आघाडीचे सूत्र कायम ठेवून उपमुख्यमंत्रिपद तसेच मागची महत्त्वाची खाती मिळवायची. तसेच शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, तारिक अन्वर यांच्या पैकी दोघांना केंद्रात मंत्रिपदी बसवायचे, असेही राष्ट्रवादीच्या डोक्यात असल्याचे दिसून येते.

काँग्रेसचे पाडकाम करण्याचा डाव
मागच्या तीन विधानसभा निवडणुकांत काँग्रेस एक नंबरचा पक्ष राहिल्याने राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रिपदाचे मनसुबे सफल होऊ शकले नाहीत. या वेळी मात्र पंचरंगी मुकाबल्यात काँग्रेसचे अधिकाधिक उमेदवार कसे पडतील, याची काळजी राष्ट्रवादीकडून घेतली जाणार असल्याचे बोलले जाते.मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथे काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचे राष्ट्रवादीचे डावपेच आहेत.

सर्व पत्ते खुले : राष्ट्रवादी भाजपशी हातमिळवणी करू शकते, अशी चर्चा होऊ लागल्याने राष्ट्रवादीने आपले हुकमी धर्मनिरपेक्षतेचे पुरोगामी कार्ड बाहेर काढले आहे. मात्र, १९७७ मध्ये पुलोदचा प्रयोग करताना पवारांनी वसंतदादांचे सरकार पाडले होते. समाजवादी साथींना एकत्र घेऊन त्यांनी आपले सरकार स्थापन केले. मात्र, नंतर समाजवादींची साथ सोडून पवार पुन्हा काँग्रेसबरोबर आले. यामुळे पवार विधानसभेनंतर आपले सर्व पत्ते ओपन ठेवतील, असेही सांगितले जाते.

‘भाऊबंदकी’ची काळजी...
शरद पवार यांनी भविष्याचा विचार करून आता स्वत: सत्तेत जाण्याऐवजी सूत्रधाराच्या भूमिकेत जाण्याचा विचार करत आहेत. हे करताना त्यांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांना दिल्लीत ठेवायचे आणि अजित पवार यांना राज्याची जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सुप्रिया विरुद्ध अजित असा वाद उद‌्भवणार नाही, ही काळजी घेतलेली दिसते.