आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये फेरबदल होणार असून, मंगळवारी राजभवनावर नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यादी घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर गेले होते. तथापि, केंद्रीय कृषिमंत्री व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र दोन-तीन दिवसांत हा फेरबदल होण्याची शक्यता सांगोला येथे व्यक्त केली.
नव्या बदलात जलसंपदामंत्री रामराजे निंबाळकर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, आदिवासी कल्याणमंत्री बबनराव पाचपुते, परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, राज्यमंत्री भास्कर जाधव यांची गच्छंती होऊ शकते. प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड (अकोले), आमदार शशिकांत शिंदे (सातारा), उदय सामंत (रत्नागिरी) , संजय सावकारे (भुसावळ) व दिलीप सोपल (बार्शी) या पाच नव्या चेह-यांना संधी देण्यात येणार आहे. राज्यमंत्री सचिन अहिर यांना बढती मिळण्याचे संकेत आहेत.
शुक्रवारी पक्षाच्या 20 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले होते. यातील पाच जणांचे राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सादर करून राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवले जातील, असे सूत्रांनी म्हटले आहे. याबाबत अजित पवार यांनी पत्र पाठवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अकार्यक्षम व भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना वगळण्यात येणार आहे.
पवार, भुजबळ, नाईक जागेवरच : उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक आदी ताकदवर नेत्यांचे मंत्रिमंडळातील स्थान कायम राहणार आहे.
प्रदेशाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड?
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी गृहमंत्री आर.आर. पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नावही स्पर्धेत असल्याचे काही नेते म्हणतात. आर.आर. याआधी प्रदेशाध्यक्ष होते. जयंत पाटील यांचा मंत्रिपदाचा अनुभव मोठा आहे. तथापि, तरुण चेह-याला संधी देणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे. या पदावर वर्णी लागल्यास आर.आर. किंवा जयंत पाटील यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाऊ शकतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.