आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Reshaffle; Most New Minister In Favor Of Ajit Pawar

राष्‍ट्रवादीत खांदेपालट; मंत्र्यांच्या निवडीवर दादांचा प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन मंत्र्यांच्या निवडीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच एकछत्री अंमल चालल्याचे दिसून येते. बार्शीचे दिलीप सोपल, साता-याचे शशिकांत शिंदे, रत्नागिरीचे उदय सामंत, भुसावळचे संजय सावकारे व आष्टीचे सुरेश धस हे सर्व दादांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांची निवड करून दादांनी पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विरोधकांना आपले ‘वजन’ पटवून दिल्याची चर्चा आहे.


केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात पक्षाच्या सर्वच 20 मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर पक्षामध्ये नवीन निवडीविषयी अनेक तर्कवितर्क होते. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्यासारखा नेताही मंत्रिमंडळात येण्याबद्दल चर्चा होती, परंतु पक्षाची धुरा काकांच्या हाती असली तरी अंतिम निवडीवर आपले वर्चस्व राखण्यात अजित पवार यशस्वी झाल्याचेच दिसून येते. कारण, सहापैकी पाच मंत्री त्यांचे कट्टर समर्थक आहेत. शिंदे, सामंत, सावकारे, धस यांच्यासारख्या तरुण नेत्यांना संधी देताना अजितदादांनी आपला गट जुन्या-ज्येष्ठ नेत्यांपेक्षा वेगळा असल्याचे दाखवून दिले.


निंबाळकर, पाचपुते, ढोबळेंवर निष्क्रियतेचा ठपका
शशिकांत शिंदे यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत साता-यातून त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे तटकरे यांच्या छत्रछायेत वावरणारे आहेत. त्यांचे व भास्कर जाधवांशी विळ्या भोपळ्याचे सख्य. जाधव यांनी पालिका निवडणुकीत पक्षाच्या विरोधात पॅनेल उभे केल्यामुळे अजित पवार नाराज. मात्र शरद पवार यांचा वरदहस्त असल्याच्या गुर्मीत वावरणा-या जाधव यांना डच्चू देऊन दादांनी गद्दारी खपवून घेतली जाणार नसल्याचा संदेश दिला. निंबाळकर, पाचपुते व ढोबळे यांच्या कारभाराबाबत असंख्य तक्रारी होत्या. त्यांच्या कामाचा फारसा प्रभावही नव्हता. ढोबळे हे तर मोहिते पाटील यांच्या फारच जवळ जात असल्याने त्यांची कन्नी कापली गेल्याचे बोलले जात आहे.


प्रदेशाध्यक्षपदावर तरुण चेहरा येणार !
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा 15 जूनला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, बबनराव पाचपुते, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. ‘शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच घोषणा केली जाईल,’ असे अजित पवार म्हणाले. आर. आर. पाटील यांना हे पद मिळणार नसल्याचे संकेतही अजितदादांनी दिले.


जातीय समीकरणे, स्थानिक राजकारणाचा विचार
मराठ्यांचा पक्ष ही ओळख असणा-या राष्‍ट्रवादीने नवे मंत्री निवडताना विविध जातीय समीकरणांचाही विचार केलेला दिसतो. पिचड हे आदिवासी समाजातील असून या विभागाचे मंत्रिपदही त्यांनी भूषवले आहे. लिंगायत समाजाचे सोपल यांचे सोलापूर भागातील काम आणि समाजावरची पकड चांगली असल्याचे पाहून त्यांना संधी दिली. शिंदे हे मराठा समाजाचे आहेत. साता-यात पक्षविरोधी कारवाया करणारे खासदार उदयनराजे यांच्या विरोधात शिंदेंना ताकद देण्यात आली. धस हेही मराठा समाजाचे असून बीडमध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लढण्यासाठी त्यांना मंत्री करण्यात आले. सावकारे हे मागासवर्गीय आहेत तर सामंत हे कुडाळदेशकर ब्राह्मण आहेत. अशा पद्धतीने सर्व समाजातील नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.


आज बैठक
राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी होणार आहे. नव्या मंत्र्यांना दुस-याच दिवशी बैठकीत सहभागाची संधी मिळणार आहे.