आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nationwide Outrage Over Journalist\'s Gang Rape In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘गँगरेप’विरोधात संताप: एक आरोपी, 20 संशयित ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- परळ भागातील शक्ती मिल परिसरात गुरुवारी एका मासिकाच्या महिला छायाचित्रकारावर पाच नराधमांनी बलात्कार केला. या प्रकारामुळे मुंबईतील असुरक्षितता पुन्हा चव्हाट्यावर आली असून विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी पोलिस व सरकारच्या हतबलतेविरोधात संताप व्यक्त केला आहे.

या घटनेतील पाचपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून मिलच्या परिसरातील 20 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच चार फरार आरोपींच्या शोधासाठी 20 पथके तैनात करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. घटनेची माहिती कळताच पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह, कायदा व सुव्यवस्था विभागाचे आयुक्त सदानंद दाते, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहपोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी पीडित तरुणीची जसलोक रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

रात्री पोलिस आयुक्तांनी तातडीची बैठक घेतली. स्थानिक पोलिस स्टेशनची दहा आणि गुन्हे अन्वेषण विभागाची दहा पथके तपासावर पाठवली. सहकारी तरुणाच्या मदतीने संशयित आरोपींची रेखाचित्रे तयार करण्यात आली.

पोलिसांनी रात्रीच तपासाला सुरुवात केली. सकाळीच महालक्ष्मी परिसरातून 20 संशयितांची धरपकड करण्यात आली. त्यातील एका संशयिताची हालचाल संशयास्पद वाटत होती. सखोल चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती सत्यपाल सिंह यांनी दिली.

आरोपींची नावे गोपनीयच
एक आरोपी ताब्यात आहे. पाचही आरोपींची नावे समजली आहेत. मात्र, सर्व आरोपी हाती लागेपर्यंत त्यांची नावे उघड करणार नाही. पीडित तरुणीने परेडमध्ये आरोपीला ओळखले असून यातील दोन आरोपींवर मालमत्ताविषयक गुन्हे नोंद असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

16 तासांत छडा
गुरुवारी दुपारी सामूहिक बलात्काराची घटना घडली. मुंबई पोलिसांनी जलदगतीने हालचाली केल्या. केवळ 16 तासांच्या आत पाचही गुन्हेगारांचा छडा लावत एका आरोपीच्या मुसक्या आवळल्याबद्दल पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.

तरुणीची प्रकृती स्थिर
पीडित छायाचित्रकार तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे. उपचाराला ती चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, अद्याप ती या धक्क्यामधून सावरलेली नाही, असे जसलोक रुग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. तरुण गियानचंदानी यांनी पत्रकारांना सांगितले.