आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 जानेवारीला नव्हे 15 ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करतात\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना गेल्यापासून आता तेही फेकूगिरी करू लागले आहेत. उद्धवजी, देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर 26 जानेवारीला नव्हे 15 ऑगस्टला भाषण करतात, अशी चपराक राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उद्धव ठाकरे यांना लगावली आहे. राज्यात जादूटोणाविरोधी कायदा पारित झाल्यामुळे गंडे, धागे-दोरे बांधून आता काहीही होणार नाही असाही टोला लगावला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत शिवसैनिकांना शिवबंधन व प्रतिज्ञा दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना चौफेर टीका केली होती. त्यावेळी उद्धव यांनी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरून काँग्रेसच्या पंतप्रधानपदाचे शेवटचे भाषण असेल असे वक्तव्य केले होते. त्यांचा हाच धागा पकडून नवाब मलिक यांनी उद्धव यांचा समाचार घेतला.
मलिक म्हणाले, मोदींसोबत उद्धवजी गेल्यामुळे त्यांच्याप्रमाणे तेही फेकूगिरी करू लागले आहेत. उद्धव यांच्या भाषणात काहीही नव्हते. उद्धव यांच्या भाषणात कसलाही आत्मविश्वास नव्हता. बाळासाहेबांनी जे सांगून ठेवले आहे की उद्धव आणि आदित्यला संभाळून घ्या हेच खरे आहे. उद्धव यांचा शिवसैनिकांवर विश्वास नसल्यानेच त्यांना बाळासाहेबांच्या आवाजाच्या ध्वनिफितीत शपथ द्यावी लागली. सेनेतील अनेक बडे नेते, खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत म्हणूनच त्यांनी गंडे व धागे-दोरे बांधण्याची चाल खेळली. पण लोक कर्तृत्त्व व नेतृत्त्वामुळे येतात व टिकतात, असेही मलिक यांनी उद्धव यांच्यावर टीकास्त्र सोडले.