आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा: शिवसेना-भाजप युतीत मोठी बंडखोरी, भाजपच्या मंदा म्हात्रेंचा वेगळाच सूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी मुंबई/ औरंगाबाद- नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. मात्र, नवी मुंबईत भाजप-शिवसेना युतीत मोठी बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. दुसरीकडे, भाजपच्या स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी युती करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईत युतीशिवाय भारतीय जनता पक्षाने झेंडा फडकावला असता असा वेगळाच सूर लावला आहे. या दोन्ही महानगरपालिकेसाठी येत्या 22 एप्रिल रोजी निवडणूक होत आहे.
नवी मुंबई, औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणुक ‘युती’ म्हणून एकत्रितपणे लढविण्याची घोषणा शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी सोमवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत केली होती. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार नवी मुंबईमध्ये शिवसेना 68, भाजप 43 तर औरंगाबादमध्ये शिवसेना 64 आणि भाजप 49 जागा लढविणार आहे. दोन्ही महापालिकांवर भगवाच फडकविण्याचा निर्धार शिवसेना-भाजप युतीने केला आहे. मात्र, युतीतील अंतर्गत मतभेद पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या जागा शिवसेनेला गेल्या आहेत त्या ठिकाणी भाजपच्या पदाधिका-यांनी तर ज्या जागा भाजपला सोडल्या आहेत त्या ठिकाणी शिवसेनेच्या पदाधिका-यांनी बंडखोरी केल्याचे आज सकाळपर्यंत चित्र होते. तरीही भाजपात मोठी बंडखोरी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
आज सकाळी नवी मुंबईतील भाजप कार्यालयात आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यात आले. मात्र, यावेळी इच्छुकांनी मोठा गोंधळ घातला. भाजपात जुने कार्यकर्ते व मागील वर्षात पक्षात झालेले नवे कार्यकर्ते असा वाद रंगला आहे. सत्तेच्या लालसेने भाजपात आलेल्यांना संधी न देता वर्षानवर्षे काम करणा-या निष्ठांवत कार्यकर्त्यांना पक्षाने उमेदवारी असा जुन्या कार्यकर्त्यांचा सूर आहे. तर, आमदार मंदा म्हात्रेंसह इतर मंडळींनी विधानसभा तोंडावर भाजपात प्रवेश केला आहे. म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनीही आम्हाला संधी मिळाली पाहिजे असा सूर लावला आहे. त्यामुळे भाजपात सध्या सावळा-गोंधळ सुरु आहे.
औरंगाबादमध्ये भाजप-शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी बंडाचे निशान फडकावले आहे. औरंगाबादच्या महापौर कला ओझा यांचे सेनेने तिकीट कापले आहे. त्यांनी दोन वॉर्डातून अर्ज दाखल केला आहे. बाळकृष्णनगर व विद्यानगर या वॉर्डातून ओझा यांनी अर्ज दाखल केला आहे. बाळकृष्णनगर हा वॉर्ड युतीच्या जागावाटपानुसार भाजपला सोडला गेला आहे तर विद्यानगरमध्ये ओझांनी शिवसेनेच्याच अधिकृत उमेदवारांविरूद्ध अर्ज दाखल केला आहे. नवी मुंबईचे महापौर व गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक यांना पक्षाने तिकीट दिले नाही. नाईक यांनी कुटुंबातील व्यक्तींना तिकीट देणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते.
भाजप-शिवसेना युतीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी झाल्याचे दिसत आहे. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन अर्ज माघारी घेण्यास भाग पाडू असे युतीच्या नेत्यांनी म्हटले आहे.