आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणांविरोधात अखेर फसवणुकीचा गुन्हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अमरावतीतील उमेदवार व अभिनेत्री नवनीत कौर-राणा यांच्याविरूद्ध अखेर फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी दाखल झाला. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच राणा यांची कोंडी झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

नवनीत कौर यांनी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी विवाह केल्यानंतर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले. हे प्रमाणपत्र बनावट दस्तऐवजांच्या आधारे तयार केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी विनंती करणारी याचिका जयंत वंजारी यांनी मुलुंड येथील महानगर दंडाधिकारी यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने 5 मार्च रोजी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. वंजारी स्वत: या निकालाची प्रत घेऊन मुलुंड पोलिस ठाण्यात गेले. दुसर्‍या दिवशी त्यांनी एफआयआर दाखल करण्यासाठी स्मरणपत्रही दिले. मात्र, राज्याचे गृहमंत्रालयच राष्ट्रवादीकडे असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. वंजारी यांच्या पत्रांना आणि फोनला उत्तरही देण्याचे पोलिसांनी सतत टाळले. 10 मार्च रोजी त्यांच्या मोबाइलवर पोलिस निरीक्षक मनसुख यांच्या मोबाइलवरून एक पत्र पाठवण्यात आले. या पत्रात योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तरीही एफआयआर दाखल झाला नाही. यामुळे वंजारी यांनी उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती. दरम्यान, कोर्टातील या लढाईला कायदेशीर मार्गानेचे उत्तर देऊ, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले आहे.

चौकशी सुरू
नवनीत राणा यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या 420, 468 आणि 471 अशा कलमांन्वये शासनाची फसवणूक करणे, बनावट दस्तऐवज तयार करणे यासंदर्भात गुन्हे नोंदण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक मनसुख याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक फुलसिंग पवार यांनी दिली.