आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीची दरवाढ करून शिवसेनेचीही पाकीटमारी- राष्ट्रवादीची रावतेंवर टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंजाने किती ओढणार आणि दातांनी किती खाणार याची स्पर्धाच आता भाजपा-शिवसेनेत पाहायला मिळेल. सर्वसामान्यांवर अतिरिक्त करभार लादून शिवसेनेचेही मंत्री पाकीटमारीचा नवा प्रयोग करत आहेत, अशी टीका आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 5 ते 25 नोव्हेंबर पर्यंत एसटीच्या तिकिटावर अतिरिक्त कर लावला आहे. सध्या एसटीवर 10 टक्के, निमआराम 15 आणि लक्झरीवर 20 टक्के कर लावण्यात आला आहे. सर्वसामान्य नोकरदारवर्ग दिवाळीच्या निमित्ताने या कालावधीत गावाला जात असतो. हीच संधी साधून जनतेची लूट केली जात आहे, असे मत मलिक यांनी मांडले. गाईवर चर्चा करू नका, महागाईवर करा, असे सेना सांगत होती. मग आता या महागाईच्या बाबतीत काय? भाजपने दुष्काळ कर लादल्यावर त्याला पाकीटमारी असे शिवसेना संबोधत होती. पण आता सेनेचेच मंत्री पाकीटमारी करत आहेत, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी या निर्णयावर टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना 50 टक्के नोकरशाही आमचे ऐकत नाही, असे सांगितले होते. याचा अर्थ एकतर तुम्ही त्यांना बेकायदेशीर कामे करायला लावत आहात किंवा तुम्ही प्रशासन चालवायला असमर्थ आहात. जर खालचे अधिकारी तुमचे ऐकत नसतील तर मुख्यमंत्री पदावर राहण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री अविश्वास दाखवत आहेत. मलिक यांनी सरकारच्या अकार्यक्षमतेवर ताशेरे ओढले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री अविश्वास दाखवत आहेत. ही एकप्रकारे संघाची मानसिकता आहे. राज्यात 50 टक्के अधिकारी हे आरक्षणाच्या कोट्यातून एस. सी, एस. टी आणि ओबीसी या प्रवर्गातून आलेले आहेत. संघ आरक्षणाच्या विरोधात आहे. त्यांच्या वेळोवेळच्या वक्तव्यावरून हे जाहीर झाले आहे. त्यामुळे याच मानसिकतेतून बहुधा मुख्यमंत्री अधिकाऱ्यावर अविश्वास दाखवत आहेत. मुख्यमंत्री जातीचे विष पेरत आहेत काय? असा प्रश्न मलिक यांनी उठवला. तसेच, यामुळेच मुख्यमंत्र्यांनी घटनात्मक पद्धतीला बगल देत खाजगी पद्धतीने अधिकारी नेमण्याची प्रक्रिया चालू केली आहे. मागासवर्गीय प्रवर्गातून नियुक्त्या झालेल्या अधिकाऱ्यांना टाळण्यासाठीच ही खाजगी प्रक्रिया चालू आहे का, असेही त्यांनी विचारले.
कल्याण-डोंबिवलीच्या त्या 27 गावांतील जमिनींबद्दल वक्तव्य करताना नवाब मलिक यांनी ही 10 हजार एकर जमीन भाजपच्या आमदार- खासदारांची आहे. भाजप स्वतः च्या माध्यमातून या जमिनीचा विकास करणार असून यातून त्यांना किमान 40 हजार ते 4 लाख कोटींचा नफा अपेक्षित आहे, असे सांगितले. भाजपच्या या कार्यक्रमात आपल्यालाही वाटा मिळावा म्हणून सेना आणि भाजप आपसात वाद सुरू आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
बातम्या आणखी आहेत...