मुंबई - ‘शरद पवार आणि मायावती यांच्यादरम्यान अजून तरी युती करण्याबाबत कोणतीही भेट किंवा चर्चा झालेली नाही. मात्र केंद्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता समविचारी पक्षांना सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न असून अशा पक्षांशी युतीचे सर्व पर्याय खुले आहेत,’ असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केले. यावरून बसपासोबत तडजोडीची राष्ट्रवादीची चर्चा सुरूच राहील, हे स्पष्ट झाले आहे.
गेले दोन दिवस पवार आणि मायावती यांच्यादरम्यान भेट झाल्याच्या बातम्या चर्चिल्या जात आहेत. मात्र अशा प्रकारे दोन्ही पक्षांच्या तडजोडीसंदर्भात कोणतीही भेट किंवा चर्चा या दोन नेत्यांमध्ये झाली नसल्याचा खुलासा मलिक यांनी केला आहे. दरम्यान, बसपाने मात्र राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीची शक्यता फेटाळली असली तरी राष्ट्रवादीने मात्र अशा चर्चेला पूर्णपणे नकार दिलेला नाही.
वाढीव जागांच्या मागणीवर ठाम
राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली असून पक्षातर्फे सध्या जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू आहेत. याबाबत मलिक म्हणाले की, येत्या आठवडाभरात काँग्रेसबरोबर आमच्या ज्येष्ठ नेत्यांची प्राथमिक चर्चा होणे अपेक्षित आहे. सद्य:स्थितीचा विचार करता प्रत्येक जागेबाबत स्वतंत्र विचार करण्याची आमची भूमिका असेल. बदलत्या राजकीय परिस्थितीत जिथे ज्या पक्षाची अधिक ताकद आहे तिथे त्या पक्षाचा विचार होण्याची गरज आहे. आगामी जागावाटपात अधिक जागांची मागणी राष्ट्रवादी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जाहीरनामा समितीत आरआर, सुप्रिया सुळे
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समितीची घोषणा केली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीत आर. आर. पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे आणि ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांचा समावेश असून नवाब मलिक हे या समितीचे निमंत्रक असणार आहेत. राज्यातले विविध प्रश्न आणि त्याबाबत पक्षाची भूमिका लक्षात घेऊन जाहीरनामा तयार केला जाणार आहे. सध्या तरी दोन्ही कॉँग्रेस आपापले स्वतंत्र जाहीरनामे तयार करतील. एकत्रित जाहीरनाम्याबाबत नंतर विचार केला जाईल,’ असेही मलिक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
प्रदेशाध्यक्ष बदल नाही
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भास्कर जाधव यांच्याऐवजी ओबीसी चेहरा असलेले व अजित पवारांचे निकटवर्ती जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंचे नाव त्यासाठी आघाडीवर आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या जाहीरनामा समितीत भास्कर जाधव यांचे नाव नसल्याने त्यांना हटवण्याची चर्चाही जोरात आहे. याबाबत विचारले असता मलिक म्हणाले की, तसा कोणताही विचार पक्षात सुरू नाही. या समितीत जाधव यांचा समावेश नसला ही समिती प्रदेशाध्यक्षांच्या देखरेखीखालीच काम करेल.’