आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...निरो फिडल वाजवत होता, दुष्काळात मुख्यमंत्र्यांच्या रंगल्या फाइव्ह स्टार पार्ट्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई - राज्यातील जनता दुष्काळात होरपळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र काही भांडवलदार व उद्योजकांसाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करीत आहेत. हे म्हणजेे ‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’, असा प्रकार झाला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी गुुरुवारी केली.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक बुधवारी रात्री पंचतारांकित हाॅटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला देश व राज्यातील नामवंत उद्योगपतींनी हजेरी लावली होती. त्यावर मलिक म्हणाले, ‘राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती अाहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यभर फिरून जनतेला दिलासा देण्याची गरज अाहे. मात्र मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन करीत आहेत. यावरुन मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नांवर किती असंवेदनशील अाहेत हे दिसून येते. सध्याचे सरकार शेतकरी विरोधी व भांडवलदारांचे सरकार असल्याचा हा प्रकार आहे,’ असे मलिक यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्ट्याची परंपराच
राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांच्या पार्टीवर टीका हाेत असली तरी प्रत्यक्षात अाघाडी सरकारच्या काळातही स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अशा पंचतारांकित पार्ट्या झाल्या अाहेत. सरकारमध्ये अशी जुनी परंपरा असून विविध देशांच्या वाणिज्य दूतांना त्यात अामंत्रित केले जाते, असे मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. अाघाडी सरकारच्या काळात झालेल्या पार्टींची कागदपत्रे व त्यात उपस्थित पाहूण्यांची यादीही या कार्यालयाकडून दाखवण्यात अाली. इतकेच नव्हे तर अन्य देशाच्या स्वातंत्र्य दिनीही राज्य सरकारतर्फे अशी पार्टी दिली जात असल्याचे सांगण्यात अाले. नुकताच अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन व दोन दिवसांपूर्वी सिंगापूरचा स्वातंत्र्यदिनही अशाच प्रकारे मुंबईतील पंचतारांकित हाॅटेलमध्ये सरकारच्या वतीने साजरा करण्यात अाला हाेता. दरम्यान, या विषयावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही.