आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’ने मुंबई विकायला काढली, वीज घोटाळ्याच्या आरोपाला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आम आदमी पक्षाने मुंबई विकायला काढली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत योगेंद्र यादव आणि आपच्या इतर नेत्यांनी सिंगापूरच्या काही उद्योजकांसोबत ‘रिमेकिंग ऑफ मुंबई’ नावाने दहा लाख कोटींच्या प्रकल्पाची चर्चा केली. तसेच निधीही उकळल्याचा आरोप मलिक यांनी केला. हा निवडणूक खर्च उभा करण्याचा ‘आप’चा उद्योग असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
अंजली दमानिया यांनी राज्याच्या वीज खात्यात कोळसा खरेदीत 22 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीनेही ‘आप’वर आरोपांच्या फैरी झाडल्या. सरकारी कोळसा कंपन्या मागणीइतका पुरवठा करू शकत नसल्याने खासगी कंपन्यांकडून कोळसा खरेदीचा निर्णय केंद्रानेच घेतला आहे. त्यात राज्याचा हस्तक्षेप नसतो, त्यामुळे दमानियांचे आरोप निराधार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले आहे,
योगेंद्र यादव यांनी वरळीच्या नॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये सिंगापूरच्या विकासकांबरोबर दक्षिण मुंबईच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केल्याचा आरोप मलिक यांनी केला. मयंक गांधी यांनी काही वर्षांपूर्वी रिमेकिंग ऑफ मुंबई या नावाने तयार केलेल्या दहा लाख कोटींच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पावर चर्चा करून त्यांनी पक्षासाठी देणग्या उकळल्या. या बैठकीच्या माध्यमातून मुंबई परदेशी कंपन्यांना विकण्याचा डाव ‘आप’ने आखला आहे. हिंमत असेल, तर बैठकीतील चर्चा उघड करा असे आव्हानही मलिक यांनी दिले आहे.
माझा संबंधच नाही : मयंक
मयंक गांधी यांनी मात्र मलिक यांचे आरोप निराधार असल्याचे सांगितले. रिमेकिंग ऑफ मुंबई या नावाने एक एनजीओ होती. ती मी दोन वर्षांपूर्वी सोडली असून वरळीला झालेल्या बैठकीत परदेशी उद्योजक नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.