आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Chief Fails To Pacify Rebel MLA News In Divya Marathi

नारायण राणेंच्या पायाखालची वाळू सरकली; शरद पवारांचीही मध्यस्थी फसली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा मुकाबला आता राज्यभर चर्चेचा होत चालला आहे. काँग्रेसचे उमदेवार व उद्योगमंत्री नारायण राणेंचे चिरंजीव नीलेश राणेंचा प्रचार करणार नाही म्हणजे नाही, अशी भूमिका आमदार दीपक केसरकर यांनी घेतली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमधील तब्बल 400 पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले होते. राष्ट्रवादीच्या असहकारामुळे राणेंच्या पायाखालची वाळू सरकल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना मध्यस्थी करण्याचे साकडे घालण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी केसरकर यांना मुंबईत बोलावून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र केसरकरांचा राणेविरोध ठाम असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे निष्ठावंत काँग्रेसजनांच्या राणेंविरोध टोकाला पोहोचला असल्याने काँग्रेसला रत्नागिरी सिंधुदुर्गमधील जागा गमवावी लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादीकडून कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केसरकरांची भेट घेऊन प्रचारात उतरण्याचे आवाहन केले होते. मात्र, मी प्रचार करणार नाही, असे केसरकरांनी आव्हाडांना सुनावले.

शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कणकणलीत प्रचार सभा होती. आघाडीच्या या संयुक्त सभेला किमान दहा हजार लोक उपस्थित राहतील, अशी आशा वाटत होती. मात्र, हजारही माणसे नसल्याने अजित पवारांबरोबर नारायण राणेंना मोठा धक्का बसला आहे. सभेला लोक नसल्यामुळे उशिराने ती सुरू झाली. मात्र तरीही लोक न आल्याने राणेंविरोधातील राग स्पष्टपणे दिसून आला. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बंडाचे निशाण खाली ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला. अजित पवारांनाही सिंधुदुर्गमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा टोकाचा राग दिसून आला आहे. कणकवलीत त्यांचे स्वागत करण्यासाठी मोजून चार कार्यकर्ते नव्हते. प्रसाद रेगे, संजय भोगटे, अमित नाईक असे सर्व जिल्हय़ातील मिळून तीन कार्यकर्ते स्वागताला आले होते.

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या विरोधाला आम्ही भीक घालत नाही, अशी दादागिरी करणार्‍या राणेंनी एकूणच परिस्थिती पाहून वरच्या टिपेतील सूर खाली आणला आहे. त्यांनी नाराज राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे शुक्रवारी सांगितले. मात्र, आता आम्हाला तुमच्याशी बोलायचे नाही, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांचे म्हणणे आहे. आता नेते, आमदारांनीही पॅचअप करायचे ठरवले तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही, असे भिसे यांनी सांगितले.

शरद पवारांच्या रविवारच्या सभेवर लक्ष
नीलेश राणेंचा प्रचार करण्यासाठी शरद पवार रविवारी सावंतवाडीला येत आहेत. या सभेवर आता सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरीचे लक्ष लागले आहे. अजित पवारांप्रमाणे शरद पवारांच्या सभेला न जाण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तसे झाल्यास त्याचा मोठा परिणाम मतदानावर होऊन आघाडीला ही जागा गमवावी लागणार हे निश्चित, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.