आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • #NCP Chief @PawarSpeaks Addresses A Press Conference In #Patna Ahead Of NCP\'s 6th National Convention

बिहार: नितीशकुमार-शरद पवारांची भेट, NCP जनता परिवारासोबत जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन आजपासून बिहारची राजधानी पाटण्यात सुरु झाले. दोन दिवस चालणा-या या अधिवेशनात आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विचारविनिमय होणार आहे. याचसोबत राष्ट्रीय राजकारणाची सद्यस्थिती, आर्थिक परिस्थिती आणि संघटनात्मक बाबीसंदर्भात ठरावाचा मसुदा मांडला जाणार आहे.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही नितीशकुमार-लालूप्रसाद यांच्या जनता परिवारासमवेत आघाडी करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या ज्या ठिकाणी ताकद आहे अशा भागातील जागा आम्ही मागू. याबाबत लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून यापुढे तो चर्चा करून प्रश्न सोडवला जाईल. बिहारच्या जनतेत देशाला राजकारणाची नवी दिशा देण्याची नक्कीच ताकद आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ती दिशा मिळेल याची मला खात्री आहे. बिहारमधील राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी छगन भुजबळ यांनी या निवडणुकीची धुरा सांभाळावी अशी मागणी केली आहे. त्यानुसार त्यांच्यावर जबाबदारी देण्याचा विचार होऊ शकतो.
दरम्यान,यासंदर्भात शरद पवारांनी इच्छा व्यक्त करताच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पवारांना चर्चेचे निमंत्रण दिले. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा पवार आणि नितीशकुमार यांची भेट झाली. यावेळी आघाडीबाबत चर्चा झाल्याचे समजते आहे.
आपल्याला माहित असेलच की, बिहार विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे ध्रुवीकरण होऊ नये म्हणून नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल, लालूप्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व समाजवादी पक्ष या सर्वांनी एकत्र येऊन भाजपविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मर्यादित ताकद असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष होते. मात्र, राष्ट्रवादीची व्होट बॅंक पाहता शरद पवार सेक्युलर पक्षांसोबत हातमिळवणी करणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
भारतीय जनता पक्षाने बिहार निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. मात्र, सध्या तरी रामविलास पासवान वगळता त्यांच्यासोबत कोणीही बडे नेते अथवा पक्ष दिसत नाहीत. त्यामुळे जनता परिवार व काँग्रेस यांची आतातरी कागदावर आघाडी मजबूत दिसत आहे. त्यामुळेच बिहारमध्ये केवळ एक खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादीचे चाणाक्ष नेतृत्त्व नितीशकुमार यांच्या आघाडीसोबत गेल्यास नवल वाटू नये अशी स्थिती आहे. बिहारची निवडणूक लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने आपल्या पक्षाचे दोन दिवसाचे राष्ट्रीय अधिवेशन राजधानी बिहारमध्ये भरवले आहे.
भुजबळांना क्लीन चिट तर मोदींवर निशाणा-
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज सायंकाळी साडेचार वाजता अधिवेशनस्थळी आगमन झाले. यानंतर पवारांनी पाटण्यातील चाणक्य हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी पवारांना इंडिया बुल्सप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत छेडले असता त्यांनी भुजबळांना क्लीन चिट दिली. भुजबळांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे चौकशी होईल. या चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईलच असे सांगत भुजबळांविरोधात राजकीय षडयंत्र असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. त्याचवेळी, पवारांनी नितीशकुमारांच्या प्रदेशात मोदींवर निशाणा साधला. मी नुकताच राज्यातील काही भागांतून फिरून आलो. मला महाराष्ट्रातील जनतेचे अद्याप अच्छे दिन आल्याचे दिसून आले नाही असे सांगत पवारांनी आपण मोदींविरोधात असल्याचा संदेश बिहारमधील जनतेला व सेक्युलर नेत्यांना दिला आहे.
पुढे आणखी पाहा....