आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Chief Sharad Pawar Write A Letter To Maharashtra CM For Jitendra Awhad Issue

‘पाॅवर’गेम: ‘ओबीसी'च्या खांद्यावर बंदूक ठेवून 'मराठा कार्ड'वर नेम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वपक्षीय आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली. पवारांचा हा पत्रप्रपंच पूर्णतः राजकीय असल्याचे सांगत त्यांच्या विराेधकांनी याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना वैचारिक स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या अनेक घटना घडत असताना गप्प बसणारे पवार आव्हाड यांच्यावर हल्ला होेताच अचानक चिंताग्रस्त कसे झाले, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. 'महाराष्ट्रभूषण' पुरस्काराच्या राजकारणातून मराठा समाजातील विशिष्ट घटकांना जवळ करायचे आणि याचे नेतृत्त्व 'ओबीसी' नेत्याकडे सोपवून इतर मागासवर्गीयांनाही खूश करायचे अशी चाल पवारांची अाहे.

राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद असताना पुण्याच्या भांडारकर संस्थेवर हल्ला झाला. पुण्यातील अारटीअाय कार्यकर्ते सतिश शेट्टी यांचा खून झाला. महाबळेश्वर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आनंद यादव यांना धमकावून अध्यक्षपद स्वीकारु न देण्याचा प्रकार झाला. राष्ट्रवादीच्या नेत्याने ज्येष्ठ संपादकांना घरी जाऊन काळे फासण्याचा प्रकारही घडला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या 'कॉंग्रेस-राष्ट्रवादी'च्याच काळात झाली. काही जातीय संघटनांनी विशिष्ट जातीसमुहाच्या कत्तलींचे आणि दंगल- बलात्कार करण्याचे आदेश देणारे साहित्यही प्रसारीत केले. हे सर्व प्रकार राष्ट्रवादीकडे राज्याच्या कायदा व सुरक्षेची जबाबदारी असताना घडले. मात्र,यातल्या एकाही प्रकरणात संबंधितांना कडक शासन करण्याची काळजी व्यक्त करणारे पत्र देणारे पवार महाराष्ट्राने पाहिले नाहीत. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांच्याबाबतीत घङलेल्या प्रकाराची पवारांनी तातडीने दखल घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, पवारांच्या पत्राचे पडसाद विधानसभेतदेखील उमटले. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आव्हाड यांना संरक्षण देण्याची मागणी केली.
ही कसली वैचारीक लढाई : दोन वर्षांपुर्वी पुण्यात 'राष्ट्रवादी'चे अधिवेशन पार पडले होते. "पवारांची बदनामी करणारे वृत्त छापल्यानंतर आपण त्या वृत्तपत्राची होळी केली. त्यानंतर पवारसाहेब मला रागावतील असे वाटले होते. पण साहेब काहीही बोलले नाहीत," असा प्रसंग आव्हाड यांनी सांगितला. एवढेच नव्हे तर आपल्या नेत्यांवर टीका करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याचा सल्लाही आव्हाडांनी दिला होता. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, असा सल्ला देणाऱ्या पवारांनी त्यावेळी सूचक मौन पाळले होते, याची आठवण राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने करुन दिली.

ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता
"जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे ओबीसी समाजाचे लोकप्रिय व सुविद्य नेते आहेत,’ असे शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. पवारांचे हे जाहीर मतप्रदर्शन छगन भुजबळ, अण्णा डांगे, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रमेश शेंडगे, जयदत्त क्षीरसागर या प्रस्थापित ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे असल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगितले जात आहे. पवारांच्या वक्तव्याने आव्हाडांना मिळालेली चाल शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, जगजितसिंह राणा यांनाही दुखावणारी आहे.

'राष्ट्रवादी'ची दुटप्पी भूमिका
राज्य शासनाने बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार जाहीर केला आहे. याला जितेंद्र आव्हाड यांचा विरोध आहे. "शिवशाहीर म्हणून पुरंदरे यांचे काम आहे. मात्र ते इतिहासकार नाहीत," अशी भूमिका घेत पवारांनी पुरंदरे यांच्या पुरस्काराला थेट विरोध करण्याचे टाळले. 'राष्ट्रवादी' पक्षाच्यावतीनेही पुरंदरे यांच्या पुरस्काराला विरोध करण्यात आलेला नाही. "आव्हाडांना वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे," असे सांगत आव्हाडांना मात्र याविषयी बोलण्यास पवारांनी मोकळीक दिली आहे.