आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीच्या ‘त्यागा’ने आघाडीचा तिढा सुटला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी केल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरू असलेले चर्चेचे गु-हाळ शुक्रवारी संपुष्टात आले. गोरेगावचा वॉर्ड 50 मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र अखेर चर्चेअंती शुक्रवारी राष्ट्रवादीने हा वॉर्ड काँग्रेसला सोडल्यानंतर जागावाटपाचा मार्ग मोकळा झाला.
मुंबई मनपातील युतीची सत्ता संपवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न केले. दोन्ही पक्षांनी प्रदीर्घ चर्चेनंतर आघाडी केली खरी, परंतु जागावाटपावरून मतभेद निर्माण झाले होते. गोरेगाव येथील वॉर्ड 50 काँग्रेस खासदार गुरुदास कामत यांचे भाचे समीर देसाई यांना हवा होता. समीर देसाई 49 वॉर्डाचे नगरसेवक आहेत. मात्र यंदा हा वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना नजीकचा वॉर्ड हवा होता. राष्ट्रवादीचे कामगार नेते शरद राव यांनाही आपला मुलगा शशांकसाठी हाच वॉर्ड हवा होता. दोघेही या वॉर्डसाठी हट्ट धरून होते.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात शुक्रवारी फोनवरून चर्चा झाली. शरद पवार यांनी जागावाटपाचा तिढा आजच्या आज सोडवावा. कमी दिवस असल्याने उमेदवारी घोषित करणे आणि प्रचार करणे लवकर सुरू करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे एका जागेसाठी वाद वाढवू नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनीही आपल्या पक्षनेत्यांना केल्या होत्या.
अखेर राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेत वॉर्ड क्रमांक 50 काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला. या बदल्यात वॉर्ड क्रमांक 51, वॉर्ड क्रमांक 156 आणि वॉर्ड क्रमांक 171 राष्ट्रवादीला सोडण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. वॉर्ड 56 काँग्रेसला सोडण्यात आला आहे.