Home »Maharashtra »Mumbai» Ncp Congress Politics Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस आता आरपार लढाई करण्याच्या तयारीत

प्रतिनिधी | May 14, 2012, 05:06 AM IST

  • राष्ट्रवादी काँग्रेस आता आरपार लढाई करण्याच्या तयारीत

मुंबई - दिल्लीहून आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादीवर हल्ले करण्यास सुरू केल्याने आता राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनीही आपले पदाधिकारी व मंत्र्यांना आरपारच्या लढाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीच्याच एका ज्येष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’ला दिली. या पार्श्वभूमीवरच रविवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगलीतील कार्यक्रमात लक्ष्य केल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्रात अत्यल्प वावर असणा-या पृथ्वीराज चव्हाणांना उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राज्यकारभार करताना भारी पडतील, अशी चर्चा मुख्यमंत्री बदलानंतर राज्यात होती. मात्र, वर्षभर संयमी राहणा-या मुख्यमंत्र्यांनी वर्षपूर्ती होताच आपली अस्त्रे बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या राज्य सहकारी बॅँकेवरही प्रशासकाची नियुक्ती केली. यानंतर आता जलसंपदा विभागावर निशाणा साधून उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच आव्हान दिले. या विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचेही सूतोवाचही मुख्यमंत्र्यांनी केले तेव्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याचे समर्थन केले. मात्र, कॉँग्रेस मुंबईच्या विकासाकडे लक्ष देत नसल्याची टीका करून एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनाच आरोपीच्या पिंज-यात उभे केले होते.
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आता आता काँग्रेसला सरळ अंगावर घेण्याचा संदेश दिला आहे. आम्ही आघाडीचा धर्म पाळत असताना काँग्रेस मुद्दाम खोड्या काढत आहे. काँग्रेसला आता त्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ‘आता आरपारच्या लढाईला तयार व्हा’ असा संदेश राष्ट्रवादीने आपल्या मंत्र्यांना आणि अधिका-यांना वरिष्ठांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवरच शनिवारी मुख्यंमत्र्यांच्या उपस्थितीतील कोल्हापुरातील सहकार मेळाव्याकडे अजित पवारांनी पाठ फिरवली, तर गृहमंत्री आर. आर. पाटील व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी सांगलीत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. एकूणच आगामी काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वितुष्टाचे राजकारण चिघळणार असल्याचीच लक्षणे आहेत.
गृहसचिवांच्या नियुक्तीने वाद - मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीकडे मंत्रालय असलेल्या गृहविभागाच्या सचिवपदी दिल्लीतील आपले मित्र अमिताभ राजन यांची वर्णी लावली. राजन यांनी सचिवपद स्वीकारल्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा एकही आदेश मानला नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे गृहमंत्री त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. जलसंपदा विभागावर टीका व राजन यांची नियुक्ती याबाबत राष्ट्रवादीने अत्यंत गांभीर्याने घेतल्या असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
टीकेआधी सिंचनाचा अभ्यास करा; आबांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
दुष्काळाचे राजकारण: बाबांचा ‘डबलगेम’; राष्ट्रवादी नाराज
बाबा- दादांच्या स्वतंत्र बैठकाNext Article

Recommended