आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Decleared Name Of Sunil Tatkare From Raigad Loksabha

रायगडमधून सुनील तटकरेंची उमेदवारी जाहीर, मावळचा तिढा कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची उमेदवारी घोषित केली आहे. जाधव यांनी मुंबईत याची घोषणा केली. राष्ट्रवादीने ही जागा तटकरे यांच्यासाठी काँग्रेसकडून मागून घेतली होती. त्यानुसार त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तटकरे यांना आता शिवसेनेचे पाच वेळा निवडून आलेले खासदार अनंत गिते यांचे आव्हान असणार आहे. सध्याची रायगड मतदारसंघातील स्थिती पाहता गिते यांचे पारडे आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनात्मक पातळीवर वर्चस्व आहे. त्यातच सेनेच्या रामदास कदम यांनी गितेंचे काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे गितेंच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे, रायगड लोकसभा मतदारसंघात शेकापची भूमिका निर्णायक ठरेल असे सांगितले जात आहे. आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे त्यामुळेच आम्ही मतदारसंघ बदलून घेतला आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव घोषित करणे टाळले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद मिटण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तेथील तिढा कायम आहे. तसेच तो पुढील तीन-चार दिवसात सुटण्याची शक्यता नाही. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा होळीनंतरच होईल असे सांगण्यात येत आहे. कारण मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी स्वीकारण्यास आमदार लक्ष्मण जगताप यांनी नकार दिल्यानंतर आता इतर इच्छुक संजोग वाघेरे आणि गणेश खांडगे यांनीही लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात नाचक्की होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने आपले 20 जागांवर उमेदवार घोषित केले असले तरी मावळबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. दुसरीकडे, शिवसेनेने चिंचवडमधील श्रीरंग बारणेंची उमेदवारी जाहीर करून एकदाचा विषय संपविला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत पराभव जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादीने यंदा येथून विजय खेचून आणायचाच हा चंग बांधला होता. मात्र याला पहिला सुरुंग लावला तो गेल्या वेळेसची पराभूत उमेदवार आझम पानसरे. राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्याविरोधात काम केले. पक्षाशी गद्दारी करणा-या जगतापांना राष्ट्रवादी जर तिकीट देणार असेल तर अशा पक्षात काम करणे यापुढे मला जमणार नाही असे सांगत पानसरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावरून मोठ्या पवारांनी जगतापांना आवरण्याची सूचना केली. मात्र पक्षाने तोपर्यंत त्यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, पानसरे यांनी बारणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे सेनेतील नेत्यांना निरोप पोहचवला. त्यामुळे जगताप यांच्या पायाखालची वाळू सरकली.
एकवेळ ते बारणेंना उमेदवारी मिळाली तर लढू अशी भूमिका घेत होते. मात्र पक्षातून त्यांचे नाव पुढे येण्याचे संकेत मिळताच त्यांनी अनधिकृत घरांचा प्रश्न सरकारने सोडविला नाही असे सांगत आघाडीची उमेदवारी स्वीकारणार नसल्याची ताठर भूमिका घेतली. याबाबत जगताप यांनी शरद पवारांशी चर्चा केली. मात्र, मागील वेळी पक्षाच्या उमेदवाराला पाडल्याने पानसरेंसारखा ज्येष्ठ नेता सोडून गेल्याने पवार आधीच जगताप यांच्यावर नाराज होते. त्यातच त्यांनी ताठर भूमिका घेताच पवारांनी थेट त्यांचे तिकीटच कापले व जगतापांचा विषय बंद केला.
पुढे वाचा, मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडी...