आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Denied 124 Seats Who Surve Congress Of Maharashtra Assembly

राष्ट्रवादीचा काँग्रेसला एक दिवसाचा अल्टिमेटम; 124 जागा अमान्य- प्रफुल्ल पटेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काँग्रेसने देऊ केलेल्या 124 जागांचा फॉर्म्यूला राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाही. आम्ही 144 जागांची मागणी केली आहे पण काँग्रेसने यावर प्रतिसाद दिला नाही. निवडणुकीची अधिसूचना जाही झाल्याने उद्या दिवसभरात (रविवारी) जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या अन्यथा सोमवारी आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असे राष्ट्रवादीचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसला इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची इच्छा आहे पण बदलत्या राजकीय परिस्थितीवरून आता आम्हाला जास्त जागा द्यायला हव्यात अशी आमची भूमिका घेतली आहे. पटेल यांनी मुंबईत आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
पटेल म्हणाले, राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाला नेहमीच साथ दिली आहे. आमची मागील 15 वर्षापासून आघाडी आहे. केंद्रात-राज्यात आम्ही काँग्रेससोबत मनापासून काम केले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभागणी होऊ नये यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवारांनी एक पाऊल मागे घेत प्रसंगी तडजोडी केल्या. 2004 साली आम्ही 124 जागा लढवल्या. त्यावेळी पक्षाने 71 जागा जिंकल्या होत्या तर, काँग्रेसने 69 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस पक्षाच्या आग्रहास्तव आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. त्यामुळे बदलत्या परिस्थितीवरून दोन्ही पक्षांची पावले पडायला हवीत.
आमची मागणी 144 जागांची आहे पण काँग्रेसने त्यावर कोणताही प्रस्ताव अथवा प्रतिसाद दिला नाही. आमच्या पक्षाच्या व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मागील महिनाभरात यावर चर्चा केली. पण आता वेळ संपली आहे. निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली आहे. काँग्रेसला आम्ही विनंती करतो की, आम्ही तुम्हाला उद्याचा दिवस देत आहोत. पुढील 24 तासात जागावाटपाबाबत व आघाडीबाबत निर्णय घ्यावा व आम्हाला कळवावा. जागावाटपाबाबत आम्ही लाचार नाही, काँग्रेसने सन्मानजनक आकडा द्यावा. आमची आघाडी ठेवण्याची इच्छा कायम आहे. तरीही काँग्रेसकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाहीतर आम्हाला आमच्या मार्गाने पुढे जावे लागेल असा इशारा पटेल यांनी दिला.