आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Expels Gavit After Daughter Gets BJP LS Poll Ticket

डॉ. विजयकुमार गावितांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, आता समर्थकांच्या भूमिकेकडे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादीचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांची पक्षाने सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केली. गावित यांनी कन्या हिना हिला भाजपचे तिकीट मिळाल्यानंतर तिच्या प्रचारासाठी भाजपच्या व्यासपीठावर गेल्याने ही कारवाई केल्याचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले. दोन दिवसापूर्वी भाजपच्या व्यासपीठावरून कन्या हिनाचा प्रचार करताना गावित यांनी काँग्रेसचे खासदार माणिकराव गावित यांच्यावर शरसंधान साधताना मोदींवर मात्र कौतुकाचा वर्षाव केला होता. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. या आघाडी धर्माचे पालन न केल्याने राष्ट्रवादीने विजयकुमार यांची हकालपट्टी केली. मात्र, गावित यांना याची पूर्वकल्पना असल्यानेच त्यांना याबद्दल आश्चर्य वाटले नाही.
नंदूरबारमध्ये विजयकुमार गावित यांचे वर्चस्व ब-यापैकी आहे. मात्र राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्याने खासदार माणिकराव गावित यांच्याविरोधात त्यांना बंड करता येत नव्हते. गेल्या वेळी त्यांनी बंधू शरद गावित यांना समाजवादी पक्षाची उमेदवारी देऊन मतविभाजन करून माणिकराव गावितांचा पराभव करण्याचा खच्चून प्रयत्न केला. मात्र विजयकुमार यांना यश आले नाही. त्यामुळे यंदा त्यांनी कन्या हिना हिलाच भाजपची उमेदवारी घेण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी त्यांनी मंत्रिपदासह पक्षालाही सोडचिठ्ठी द्यावी लागली आहे. आता विजयकुमार गावित सलग 9 वेळा खासदार राहिलेल्या माणिकरावांना पराभूत करण्यात यशस्वी होतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.