आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ncp Is Worried About Drought Situation In Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीचा दुष्काळी मेळावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील दुष्काळी परिस्थिती आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पक्षाच्या अजेंड्यावर घेतली आहे. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळावर मात करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 4 ऑगस्टला मुंबईत एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते मदन बाफना यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मार्गदर्शन करणार असल्याचे
त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील गंभीर बनलेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेस गांभीर्याने विचार करीत असून धरणांमधील पाणीसाठा संपत असल्याची चिंता पक्षाला सतावत आहे. शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून जनावरांना चारा आणि जनतेला पिण्याचे पाणी मिळणेही कठीण होणार असल्याचे दिसत आहे. म्हणूनच या गंभीर झालेल्या स्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या यंत्रणेची आवश्यकता असल्याचे बाफना म्हणाले. यासाठी पक्षाची विशेष बैठक 4 ऑगस्टला महिला विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित केली आहे.
शरद पवारांचे मार्गदर्शन
या बैठकीला शरद पवार मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या बैठकीनंतर पक्षाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याचे बाफना यांनी सांगितले.