आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Issue In Maharashtra, Latest News In Maharashtra

राष्ट्रवादीकडून खांदेपालट; फौजियांचा पत्ता कट, सूर्यकांताबाईंना मंत्रिपद?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. पक्षाच्या चिंतन बैठकीतही अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांशी यासंदर्भात चर्चा केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. फेरबदलात सूर्यकांता पाटील व शरद गावित यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वाटते. डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे असलेले वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन हे खाते पाटील यांना देण्यात येणार असून फौजिया खान यांच्याकडचे सामान्य प्रशासन, आरोग्य व शिक्षण राज्यमंत्रिपद शरद गावितांकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विजयकुमार यांची कन्या हिना गावित यांनी भाजपच्या तिकिटावर नंदुरबारमध्ये निवडणूक लढवल्याने शरद पवार आपल्या या ज्येष्ठ मंत्र्यांवर खूप नाराज झाले होते. मात्र आपल्या मंत्रिपदाची पर्वा न करता हिनाच्या भविष्याला प्राधान्य देत विजयकुमार यांनी राजीनामा दिला. या जागी सूर्यकांता पाटील यांना संधी दिल्यास विधानसभेच्या दृष्टीने मराठवाड्यात पक्षाला मोठा फायदा होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हिंगोलीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला होती. या जागेवर सूर्यकांता यांना उभे केले जाणार होते. विशेष म्हणजे ही जागा राष्ट्रवादी हमखास जिंकणार अशी खात्री पक्षाला होती.

अदलाबदलीत मात्र काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या राजीव सातव यांना ही जागा देण्यात आली. ते निवडून आल्याने काँग्रेसची लाज वाचून खासदारांची संख्या दोनवर गेली. मात्र सूर्यकांता पाटील यांना मोठी किंमत मोजावी लागल्याने त्याची भरपाई म्हणून आता त्यांच्याकडे किमान चार महिने का होईना मंत्रिपद देण्याचा विचार आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादीला मराठवाड्यात ताकद वाढवता येईल, असे पक्षाला वाटते.
विजयकुमार राष्ट्रवादीबाहेर गेल्याने नंदुरबारमधील ताकद कमी होऊ नये, यासाठी त्यांचे भाऊ शरद गावितांना पुढे आणण्यात येईल. शरद हे समाजवादी पक्षाचे आमदार असले तरी ते राष्ट्रवादीच्या जवळ आहेत.

फौजियांचा पत्ता कट
फौजिया खान यांनी परभणीत मतदारसंघात विजय भांबळे यांच्याविरोधात काम केल्याची तक्रार पक्षाकडे आली असून यासाठी त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. दोन वेळा विधान परिषदेवर आमदार असलेल्या फौजिया खान यांची मुदतही आता संपत आहे. ही संधी घेऊन त्यांची आमदारकी सूर्यकांता पाटील यांना द्यायची, तर मंत्रिपद शरद गावितांकडे सोपवण्याचा पक्षाचा निर्णय झाला आहे.