आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कामगार मंत्रिपद देऊन भास्कर जाधवांची बोळवण, अजित पवारांच्या ‘आवडी’चे खाते मुर्शीफांकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी कॉग्रेससच्या प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्यात आलेल्या भास्कर जाधव यांना नवे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडील जलसंपदा खाते देण्याचा निर्णय बुधवार रात्रीपर्यंत निश्चित होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही याकरिता हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, काही तासांत सूत्रे फिरली आणि कोणत्याही परिस्थितीत जलसंपदासारखे मलईदार खाते भास्कर जाधवांकडे न देण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला. तसेच हे खाते त्यांच्या र्मजीतील हसन मुश्रीफ यांना बहाल करण्यात आले. परिणामी, जाधवांची कामगारमंत्रीसारख्या दुय्यम खात्यावर बोळवण झाली, अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे.

आघाडीच्या सरकारमध्ये बहुतांशी काळ जलसंपदा खाते हे अजितदादांकडेच होते. गेल्या काही वर्षांत ते सुनील तटकरेंकडे आले, पण तटकरे या खात्याचे मंत्री असले तरी त्यावर वर्चस्व राहिले ते अजितदादांचेच. पवार सांगतील तेच ‘काम’ तटकरेंनी केल्यामुळे ते कायम दादांच्या र्मजीत राहिले. मात्र, शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याने जाधवांना या पदावरून दूर करण्यात आले, तर पवारांचा नेहमीचा सामाजिक समीकरणच्या खेळात ओबीसी चेहरा प्रदेशाध्यक्षपदी असावा, यामुळे तटकरेंना हे पद मिळाले.

जाधवांचे ‘कौटुंबिक कारण’
भास्कर जाधवांना 11 जून 2013 ला राज्यमंत्रिपदावरून दूर करण्यात आले आणि त्यानंतर 15 जूनला त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. गेले वर्षभर त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली. फक्त पदांसाठी आसुसलेल्या पदाधिकार्‍यांना त्यांनी सरळ तर केले. याशिवाय आपल्या आक्रमक स्वभावाप्रमाणे पक्षात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणात त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद काढून घेताना, आपल्याला कौटुंबिक कारणांमुळे हे पद सांभाळता येणार नाही, असे वदवून घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळते प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांना गुरुवारी राज्यपाल के. शंकर नारायणन यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली.
आक्रमक स्वभाव जाधवांना नडला
भास्कर जाधव जलसंपदामंत्री झाल्यास आपल्या सोयीप्रमाणे काम होणार नाही. आपल्याप्रमाणे जाधवही आक्रमक असल्याने एखाद्या महत्त्वाच्या फाइलीचे काम मार्गी लावताना अडचण येईल. आपण म्हणू तसे जाधव ऐकणार नाहीत. याचा अंदाज आल्याने अजितदादांनी जलसंपदा मंत्रिपदासाठी हसन मुश्रीफांना पसंती दिली. कोल्हापूरच्या मुश्रीफांना आपल्या म्हणण्याप्रमाणे वागवण्यात अडचण येणार नाही, हे लक्षात आल्याने अजितदादांनी जाधवांना हे खाते देण्यास तीव्र विरोध केल्याचे समोर आले आहे.

तटकरेंना काटेरी खुर्चीवर बसवले!
जाधवांकडील पद काढून घेत तटकरेंना प्रदेशाध्यक्षपद दिले असले, तरी ही काटेरी खुर्ची आहे. कारण बरेचसे नेते मनमानी कारभार करत असून हे नेते मंत्रिपदी असले, तरी ते पक्षाची कामे मात्र करताना दिसत नाही. तसेच पक्षात काही पदे देताना कामापेक्षा आर्थिक फायदेही पाहिले जातात. पक्षाची वाढ करण्यापेक्षा नेते व पदाधिकारी एकमेकांचे पाय ओढण्यातच आपली शक्ती वाया घालवत असल्याचे दिसत आहे. ही बेशिस्त अशीच चालली तर लोकसभेप्रमाणे विधानसभेतही पक्षाला फटका बसेल, असे वाटत असल्याने शरद पवारांनी आता पक्षाला पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.