आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Leader Chagana Bhujbal Latest News In Divya Marathi

भुजबळांची संपत्ती 2642 कोटींनी वाढली, 200 कोटी कोळसा कंपन्यांमध्ये गुंतवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सार्वजनिक बांधकाममंत्री व राष्‍ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, त्यांचे पुतणे व खासदार समीर भुजबळ, पुत्र व आमदार पंकज भुजबळ या सर्वांची मालमत्ता 2009 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार फक्त 21 कोटी होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत या संपत्तीत 12 हजार टक्क्यांनी वाढ होऊन ती थेट 2663 कोटींपर्यंत पोहोचली आहे. भ्रष्टाचाराच्या विविध मार्गाने ही मालमत्ता जमवली आहे, असा आरोप भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी भुजबळांच्या संपत्तीविषयी साडेतीनशे पानांची कागदपत्रेही सादर केली. ही कागदपत्रे लाचलुचपत विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित व गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त सदानंद दाते यांनाही आपण दिली असून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्याचे सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले. भुजबळांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी लाचलुचपत विभागाने तब्बल तीन वेळा सरकारला पत्रे पाठवून परवानगी मागितली होती. मात्र, अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. हे पाहता सरकार भुजबळांना पाठीशी घालत आहे, असा आरोपही सोमय्यांनी केला.‘कंपन्यांनी आयकर विवरणपत्रेच भरली नाहीत’
2009 मध्ये भुजबळ कुटुंबीयांची मालमत्ता आणि आताची मालमत्ता यात हजार पटींनी वाढ झाली असून ती आपण माहिती अधिकारातून तसेच कंपनी नोंदणी अधिकार्‍यांकडून मागवली आहे. याशिवाय भुजबळांच्या कंपन्यांनी गेल्या कित्येक वर्षांत आयकर विवरणपत्रेही भरलेली नाहीत. या गुन्ह्याबद्दल त्यांना आयकरने किती नोटिसा दिल्या किंवा काय दंड ठोठावला, हे जाहीर करण्याची गरज आहे.
भुजबळांच्या नावे असणारे फार्म हाऊस पंचारांकित असून तेथे गरम पाण्याचे जलतरण तलाव आहेत. टोल घोटाळा, वांद्र्याची शासकीय वसाहती विकण्याचा घोटाळा, दिल्लीच्या महाराष्टÑ सदनातील अफरातफरीचा समोवश आहे. या सार्‍या प्रकरणातून जमवलेली संपत्ती ही भ्रष्टाचाराच्या मार्गाने असल्यामुळे भुजबळांच्या कंपन्यांनी आयकर विवरणपत्रे भरलेली नसल्याचे सोमय्या म्हणाले.
भुजबळांच्या मुलांच्या तसेच सुनांच्या नावाने विविध कंपन्या असून यापैकी इदीन फर्निचर या कंपनीला महाराष्टÑ सदनातील फर्निचरेचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीने अद्याप विवरणपत्र भरलेले नाही. देविसा इन्फ्रा या कंपनीचे समीर व पंकज संचालक असून येथून बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून बेनामी शेअरचे व्यवहार करून कोट्यवधींचे व्यवहार केले. वांद्रे शासकीय इमारतींच्या व्यवहारात असणार्‍ या तीन बिल्डरांनी भुजबळांना खारघरला 25 एकरांचे भूखंड फुकटात दिले, असा सनसनाटी आरोपही सोमय्या यांनी केला.
कंपन्यांच्या माध्यमातून बेनामी शेअर्सचे व्यवहार
इंटलेक्च्युअल मॅनेजमेंट कन्सल्टंट, निश इन्फ्रा, बावेश बिल्डर, आॅर्मस्ट्राँग प्युअर वॉटर, रबरेक्स, आर्मस्ट्राँग एनर्जी या कंपन्यांत भुजबळांचा मुलगा, पुतण्या, सुना व पत्नी संचालक असून या माध्यमातून बेनामी शेअर्सचे व्यवहार झाले आहेत. यातीलच 200 कोटी त्यांनी परदेशात कोळसा कंपन्यांमध्ये गुंतवले असल्याचे सोमय्यांचे म्हणणे आहे.
अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार : छगन भुजबळ
सोमय्या यांचे आरोप तथ्यहीन असून त्यांना तशी सवयच आहे. सुपारी वाजवण्याचे काम ते करतात. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अबु्र नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
आयकर विवरणपत्रे भरली :समीर भुजबळ
आमच्या सर्व कंपन्यांनी आजवर आयकर विवरणपत्रे भरली आहेत. या वर्षाची मार्च अखेरपर्यंत भरण्यात येतील. किरीट सोमय्या यांनी आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्यावर आरोप हे केले आहेत, अशी प्रतिक्रिया भुजबळांचे पुतणे राष्‍ट्रवादी चे खासदार समीर भुजबळ यांनी दिली.