मुंबई- ठाण्यातील लाखो रूपये बक्षीसांची संघर्ष दहिहंडी यंदा दुष्काळामुळे रद्द करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार दहिहंडीचे प्रमुख जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केली. मात्र, भाजपने या निर्णयावर टीका करताना आव्हाड नौटंकीबाज आहेत, असल्याचे म्हटले आहे.
आव्हाड यांना कायद्याच्या चौकटीत दहीहंडीचा सण साजरा करायचा नव्हता, त्यामुळे त्यांनी दुष्काळाचा आधार घेतला, असा टोला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला. दुष्काळग्रस्तांची एवढी काळजी होती, तर गेल्या वर्षी त्यांनी दहीहंडी रद्द का केली नव्हती? असा सवाल शेलार यांनी केला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी अश्रू काढणाऱ्या आव्हाडांनी आजवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक रुपयाही दिला नाही, चारा डेपो लावला नाही, जलयुक्त शिवारासाठी कोणतीही मदत केली नसल्याचे शेलार म्हणाले.
शेलारांनी अक्कल शिकवू नये:
दही आणि हंडी याचा काही संबंध नसलेल्या शेलारांनी मला अक्कल शिकवू नये, असे प्रत्युत्तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. शेलारांनी आयुष्यात कधी दहीहंडी साजरी केली आहे का? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.