आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ncp Leader Ramesh Adaskar Joins In Bjp Once Again

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडमध्ये राष्ट्रवादीला पहिला झटका, रमेश आडसकर झाले भाजपवासी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/ औरंगाबाद- बीडमधील राष्ट्रवादीचे नेते रमेश आडसकर यांनी पक्षाला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आडसकर यांनी औरंगाबादमध्ये आज प्रवेश केला. आडसकर यांच्यासोबत बीड जिल्हा परिषदेच्या चार सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मूळचे भाजपचेच असलेले आडसकर सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. 2009 साली गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात आडसकर यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे मुंडेंनी 1 लाख 40 हजार मतांनी विजयश्री खेचून आणली होती. आता तेच आडसकर महायुतीची सत्ता येण्याची शक्यता दिसू लागताच भाजपवासी झाले आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यात अनेक नेते तयार केले. मात्र, सत्तेसाठी ते सर्व नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. आता महायुतीची सत्ता येणार असे दिसू लागताच याच नेत्यांनी पुन्हा भाजपात येण्याचा प्रवास सुरू झाल्याचे मानण्यात येत आहे.
रमेश आडसकर हे बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघातील नेते आहेत. सध्या ही जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. येथून राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे आमदार आहेत. तर, आता राष्ट्रवादी पुन्हा एकदा विमल मुंदडा यांचे चिरंजीव अक्षय मुंदडा यांना तिकीट देण्याच्या विचारात आहे. मुंदडा आणि आडसकर यांचे गेल्या 20 वर्षात कधीच जमले नाही. त्यामुळे तालुक्यात कोणतेही राजकीय भविष्य नसल्याने आडसकर यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये जाण्याचा व पंकजा मुंडेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.