मुंबई - राज्यातील वारे महायुतीच्या दिशेने वाहू लागल्याचा अंदाज आल्याने सध्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे दिग्गज नेतेही पक्षांतराच्या तयारीत आहेत. या हालचालींचा अंदाज आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘खबरी’ यंत्रणा सतर्क झाली असून अस्वस्थ नेत्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. गेली दहा वर्षे सिद्धिविनायक मंदिर संस्थानच्या अध्यक्षपदी असलेल्या सुभाष मयेकर यांची ‘मातोश्री’वरील गुप्त भेट अवघ्या काही मिनिटांत पवारांपर्यंत पोहोचली आणि दुसर्याच दिवशी त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
2004 पासून मयेकर हे सिद्धिविनायक संस्थानचे अध्यक्ष आहेत. त्यांना विधान परिषदेवर आमदार व्हायचे होते. मात्र राष्ट्रवादीत हे स्वप्न पूर्ण न झाल्याने त्यांची पावले शिवसेनेकडे वळू लागली आहेत.
22 जुलै रोजी त्यांनी ‘मातोश्री’च्या पायर्या चढल्या होत्या. या भेटीबद्दल दोन्ही बाजूंकडून अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार आणि नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या दीपक केसरकर यांच्या सल्ल्यानुसार मयेकरांनी हे पाऊल उचलले होते. मात्र त्यांना ट्रस्टच्या अध्यक्षपदाची खुर्चीही सोडायची नव्हती. त्यामुळे काही दिवस राष्ट्रवादीत राहून ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करण्याचा मयेकरांचा मानस होता.
मयेकर यांची ‘मातोश्री’वरील भेटीची बातमी काही क्षणातच खबरी यंत्रणेने पवारांपर्यंत पोहोचवली आणि तत्काळ त्यांची अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. आता दक्षिण मुंबईतील युवा पदाधिकारी नरेंद्र राणे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. काही तासांतच घडलेल्या पवारांच्या या कारवाईच्या धसक्याने अस्वस्थ झालेले मयेकर आता 5 ऑगस्टला केसरकरांच्या सोबतीने सावंतवाडी येथे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी आमदार शंकर कांबळी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश दळवी तसेच शिवाजी कुबलही या वेळी पक्षप्रवेश करणार आहेत.
आजी-माजी मंत्र्यांवरही पवारांचे लक्ष!
सत्ता बदलाचे वारे सध्या राज्यात जोरात वाहू लागल्याने राष्ट्रवादीच्या अस्वस्थ मंत्र्यांना त्यांची चाहूल आधीच लागली आहे. अशा अस्वस्थ मंत्र्यांच्या हालचाली टिपण्यासाठी पवारांनी पोलिस यंत्रणेतील काही विश्वासू माणसांबरोबरच विरोधी पक्षांमधील हितचिंतकांनाही हाताशी घेतले आहे. हालचालीची माहिती आपल्या हाती काही तासांतच मिळेल, अशी यंत्रणा पवारांनी तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.