मुंबई - मनी लाँडरिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सकाळी भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुजबळांच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी सुप्रियांनी ही भेट घेतली असल्याचे मानले जाते. या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले तेव्हा काहीही बोलण्यास नकार देत त्यांनी "हॅपी होली' एवढेच उत्तर दिले.
भुजबळ-सुप्रिया सुळे यांच्या भेटीबाबत प्रसारमाध्यमांना उत्सुकता होती. पण पत्रकारांना होळीच्या शुभेच्छा देत सुप्रिया यांनी काढता पाय घेतला. भुजबळांना ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांचा मुक्काम आर्थर राेड तुरुंगातच असेल. सध्या भुजबळांबरोबर त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचीही कसून चौकशी सुरू आहे.
पंकजची कसून चौकशी : छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज यांची शनिवारी मुंबई धर्मामदाय आयुक्तालयात एमईटी प्रकरणी कसून चौकशी झाली. पाच तास ही चौकशी चालली.
२८ मार्चला ११ वाजता पुन्हा पंकज धर्मादाय आयुक्तांसमोर हजर राहतील. सुनील कर्वे यांचे वकील देवदत्त सिंह यांनी पंकज यांची उलट तपासणी केली. एमईटी या ट्रस्टमार्फत मुंबईत मोठा िवस्तार असलेले एमईटी महाविद्यालय चालवले जाते. काही आर्थिक गैरव्यवहार एमईटीमार्फत केले गेल्याची माहिती चौकशीत समोर आल्याने पंकज यांची चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.