आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढय़ातून विजयसिंह, बुलडाण्यात शिंगणे! रखडलेल्या उमेदवारांवर राष्ट्रवादीचे शिक्कामोर्तब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा उमेदवारांच्या निवडीवर अखेरचा हात फिरवण्याची प्रक्रिया राष्ट्रवादीत सुरू झाली आहे. शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची, तर बुलडाण्यात माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारी निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे माढय़ातील पेच मिटला असून बुलडाण्यात मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
लोकसभा उमेदवार निवडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर शनिवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत माढा आणि बुलडाण्याच्या जागेबाबत सविस्तर चर्चा होऊन झाली. माढा मतदारसंघातून जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील या तिघांच्या नावावर विचार सुरू होता. शनिवारी सकाळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला व नंतर मोहिते पाटलांच्या नावावर अपेक्षेप्रमाणे शिक्कामोर्तब केले.
खेडेकरांचा पत्ता कट
बुलडाण्याच्या जागेसाठी राजेंद्र शिंगणे आणि रेखा खेडेकर यांच्यात स्पर्धा होती. मात्र, शिंगणे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने पक्षाने खेडेकर यांचा पत्ता कापला. गेल्या वेळीही शिंगणे यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, शिवसेनेचे प्रतापसिंह जाधव यांनी त्यांना पराभूत केले होते. बुलडाणा जिल्हा बँक आर्थिक डबघाईला आली असून या बँकेला आर्थिक मदत करावी यासाठी शरद पवार व अजित पवार यांनी मनावर घेतले आहे. या बँकेला जीवनदान दिल्यास निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो, असे राजेंद्र शिंगणे यांनी बैठकीत सांगितले. आता रविवारी सकाळच्या सत्रात राष्ट्रवादीचे नेते नाशिक आणि दिंडोरीच्या जागांबाबत चर्चा करतील व दुपारनंतर 22 जागांवर अंतिम निर्णय घेणार असल्याचे कळते.
मोहिते बंधू आमने-सामने?
माढाच्या उमेदवारीवरून आघाडीप्रमाणे महायुतीतही संघर्ष आहे. रासपचे नेते महादेव जानकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दावा केला आहे, तर दुसरीकडे ही जागा रिपाइंला सोडून माजी खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील यांना रिंगणात उतरवण्याच्या पर्याय विचाराधीन आहे. चारच दिवसांपूर्वी ते स्वत: रामदास आठवले यांना सोलापुरात भेटले होते. शनिवारी प्रतापसिंह यांचे पुत्र धवलसिंह यांनी मुंबईत आठवलेंची भेट घेऊन माढाची जागा रिपाइंच्या पदरात पाडून घेण्याची मागणी केली, असे झाल्यास माढा मतदारसंघात विजयसिंह व प्रतापसिंह या दोन भावांमध्ये लढत रंगण्याची चिन्हे आहेत.