आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मधुकर पिचड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी विद्यमान प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांना पुन्हा संधी देण्यात आली. शनिवारी पक्षाच्या नेत्यांची मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. या पदासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील. जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर आदींची नावे चर्चेमध्ये होती. तरीही २०१४ साली होणारी विधानसभेची निवडणूक लक्षात घेत पिचड यांचीच फेरनिवड केल्याचे पक्षाने म्हटले आहे. तर कोषाध्यक्षपदी हेमंत टकले यांची निवड झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थितीत यांची निवड करण्यात आली.
पिचड यांनी राष्ट्रवादीला काँग्रेसला नंबर एकचा पक्ष केल्याने त्यांची फेरनिवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये आणि अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चांगले यश मिळवले होते. त्यामुळेच मित्र पक्ष काँग्रेसला मागे टाकत राष्ट्रवादी पक्ष राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आला. त्यातच मागील महिनाभर राज्य पातळीवर पक्षाच्या अंतर्गत निवडणुका झाल्या व 44 जिल्हाध्यक्षांची नेमणूकही पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिवाय ज्या नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी घेतली जात होते ते नेते मंत्रीपदावर आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपद सोडवत नव्हते. शिवाय दुसरा चांगला पर्याय पक्षाकडे नव्हता. पिचड यांचे अजित पवार यांच्याशीही चांगले जुळते. त्यामुळे दादांनी पिचड यांच्या फेरनिवडीला विरोध केला नाही. पक्षाकडे दोन-चार पर्याय चांगले होते. मात्र अजितदादांच्या ऐकण्यातील ते नसल्याने त्यांचा फारसा विचार झाला नाही. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार गोविंदराव अदिक यांच्याकडे पक्ष संघटनेचा मोठा अनुभव होता. मात्र दादांचा त्यांना असणारा अंतर्गत विरोध लक्षात घेता पिचड यांचीच फेरनिवड योग्य ठरेल, अशा मतापर्यंत राष्ट्रवादीचे नेतृत्त्व आल्याचे कळते.
मुंबई अध्यक्षाची निवड लांबणीवर - आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी निर्णय घेतला गेला नाही. मुंबईचा अध्यक्ष मराठी असावा की अमराठी यावरुन पक्षात मंथन सुरु आहे. मात्र, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या जागा न वाढल्याने मराठी माणूसच अध्यक्ष हवा, असा मुद्दा पुढे आल्याने याबाबत निर्णय लांबणीवर टाकल्याचे कळते. दरम्यान यासाठी इंदू मिलसाठी आंदोलन करणारे विजय कांबळे, मुंबईतून विधान परिषदेवर गेलेले आणि दलितांसाठी आवाज उठवणारे राम पंडागळे, छगन भुजबळ यांचे समर्थक आणि स्थापनेपासून पक्षात असणारे बाप्पा सावंत, शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले व कामगार संघटनांचे नेतृत्व करणारे किरण पावसकर यांच्या नावाची चर्चा आहे.
राष्ट्रवादीकडून मागासवर्गीयांचे ‘कल्याण’; अजित पवार यांनी घेतले महत्त्वपूर्ण निर्णय