आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची आज निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन प्रदेशाध्यक्षाची शनिवारी मुंबईत घोषणा होणार आहे. या पदासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी विद्यमान प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनाच पुन्हा संधी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पिचड यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये आणि अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चांगले यश मिळाले आहे. मित्र पक्ष काँग्रेसला मागे टाकत पक्ष राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची सर्वसाधारण सभा नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शनिवारी होणार असून त्यामध्ये प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होणार आहे. गेला महिनाभर राज्य पातळीवर पक्षाच्या अंतर्गत निवडणुका झाल्या व 44 जिल्हाध्यक्षांची नेमणूकही करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष म्हणून पिचड यांची तीन वर्षांची कारकीर्द संपत असून त्यांच्या जागी गृहमंत्री आर. आर. पाटील, जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर आदींचे नावे चर्चेमध्ये होती. पिचड यांना बढती देऊन मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा विचारही पक्षामध्ये सुरू होता. मात्र सध्या मंत्रिमंडळ विस्तार किंवा बदलाबाबत काहीच हालचाली नसल्याने पिचड यांना मंत्रिमंडळात लगेच समाविष्ट करणे शक्य नाही. त्यामुळे पिचड यांना प्रदेशाध्यक्षपदी एक वर्षाची मुदत वाढवून मग मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी सामावून घेतले जाऊ शकते, असे पक्षातील एका नेत्याने सांगितले.
पवारांचा निर्णय अंतिम
दरम्यान, या पदाबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवारच घेतील, अशी प्रतिक्रिया प्रवक्ते मदन बाफना यांनी दिली. पवार शुक्रवारी रात्रीच मुंबईमध्ये येणार असून उद्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत त्यांची सकाळी चर्चा होईल. त्यामुळे पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार का, याबाबत आता सांगणे कठीण असल्याचे ते म्हणाले.
मुंबई अध्यक्षाची निवड लांबणीवर पडणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदासाठी मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे शनिवारी होणाºया सभेमध्ये मुंबई अध्यक्षाची घोषणा होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या जागा न वाढल्याने व मराठीच अध्यक्ष हवा, असा मुद्दा पुढे आल्याने मराठी नेत्यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामध्ये इंदू मिलसाठी आंदोलन करणारे विजय कांबळे, मुंबईतून विधान परिषदेवर गेलेले आणि दलितांसाठी आवाज उठवणारे राम पंडागळे यांची नावे घेतली जातात. तसेच छगन भुजबळ यांचे समर्थक आणि स्थापनेपासून पक्षात असणारे बाप्पा सावंत, शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले व कामगार संघटनांचे नेतृत्व करणारे किरण पावसकर यांचीही नावे आघाडीवर आहेत.