आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Manifesto Published On Monday Latest News In Marathi

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे गुपचूप प्रकाशन, मराठा आरक्षणाचे त्रोटक आश्वासन!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीचा आपला जाहीरनामा सोमवारी गुपचूप जाहीर केला. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना, स्वतंत्र राज्याच्या निर्मितीला पाठिंबा, वीजनिर्मिती व रोजगार वाढीचे आश्वासन पक्षाने दिले आहे. तर बहुचर्चित मराठा आरक्षणाच्या कळीच्या मुद्दय़ाचा मात्र ओझरता उल्लेख केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणताही गाजावाजा न करता वेबसाइटवर गुपचूप जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात भ्रष्टाचार निर्मूलनाबरोबरच राज्याची विजेची गरज भागवण्यासाठी खासगी उद्योगांना प्रोत्साहन देणे, डॉ. आंबेडकरांच्या नावे जागतिक दर्जाचे घटनात्मक संशोधन केंद्र उभारणे, नवीन राज्यांच्या निर्मितीला सशर्त पाठिंबा तसेच 2030 पर्यंत देशातील प्रमुख शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचे आश्वासनही पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे.
या 32 पानी जाहीरनाम्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षणाचा मात्र ओझरता उल्लेख केला आहे. शिक्षण, नोकरी आणि प्रशासकीय सेवांमध्ये मुस्लिम आणि मराठा अशा दुर्बल घटकांनाही आरक्षण देण्यात येईल, अशा एका ओळीत हा कळीचा मुद्दा आटोपता घेतला आहे. अनुसूचित जाती आणि जमातीतील लोकांनी धर्मांतर केले तरी त्यांना आरक्षणाचा लाभ मिळायला हवा, अशी भूमिकाही पक्षाने घेतली आहे.
खासगी वीजनिर्मितीला प्रोत्साहन
छोट्या राज्यांच्या निर्मितीसारख्या वादग्रस्त मुद्दय़ांवरही पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे. जनआंदोलने, स्थानिकांच्या भावना आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यता प्रस्थापित झाली तर नवीन राज्यांच्या निर्मितीला पाठिंबा देताना राष्ट्रवादीने विदर्भाचा मात्र नामोल्लेख टाळला आहे. राज्यातील विजेच्या टंचाईची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीने भरीव तरतुदीबरोबरच खासगी क्षेत्राला वीज निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्याची गरज अधोरेखित केली आहे. तसेच ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे आश्वासनही दिले आहे. ग्रामीण विकासासह शहरी राहणीमान सुधारण्यासाठी 2030 पर्यंत प्रमुख शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा मनोदय पक्षाने व्यक्त केला आहे.

जाहीरनाम्यातले ठळक मुद्दे
0रोजगारवृद्धीसाठी अधिकाधिक प्रयत्न
0अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार
0इंग्रजी भाषेच्या प्रचारासाठी प्रयत्न
0वित्तीय क्षेत्रांत स्थानिक गुंतवणुकीला चालना देऊन परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यावर भर
0विकासकामांबरोबरच पर्यावरण रक्षणावर भर
0अन्नधान्य आणि अन्य नगदी पिकांवरील करांची पुनर्रचना
0मूलभूत सुविधा देण्यासह मानवी हक्कांचे संरक्षण
अल्पसंख्याकांना वेगळे कायदे
अल्पसंख्याकांसाठी वेगळे कायदे, स्वतंत्र तरतुदी व न्या. सच्च्र आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. कामगार कल्याण, उद्योग, अंतर्गत सुरक्षा, आरोग्य, गृहनिर्माण, महिला विकास आदी मुद्देही जाहीरनाम्यात आहेत.
कृषी क्षेत्रावर भर
संपूर्ण कृषी क्षेत्राला सामावून घेईल अशी पीक विमा योजना आणणे, शेतमालावरच्या देशांतर्गत वाहतुकीवरचे निर्बंध उठवणे, भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींना कर्जमाफी देण्याचे आश्वासन राष्ट्रवादीने दिले आहे.