आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारविरोधी वातावरण, कामाला लागा : शरद पवार; 5 नोव्हेंबरला औरंगाबादेत अधिवेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कर्जमाफी मिळण्यास होत असलेला विलंब, नोटबंदीमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवरून सरकारविरोधातील संघर्षात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता रस्त्यावर उतरणार आहेत. या सर्व मुद्द्यांवरून सरकारविरोधी वातावरण तयार होत आहे. त्यामुळे कामाला लागा, असे आदेशही त्यांनी आपल्या नेत्यांना दिले. तसेच कर्जमाफीच्या मुद्द्यावर संघर्षाची रणनीती आखण्यासाठी ५ नोव्हेंबरला औरंगाबाद येथे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.   
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत कर्जमाफी, महागाई, वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवरून सरकारविरोधात संघर्षाची भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर कठोर शब्दांत टीका केली. गेल्या ५५ दिवसांत राज्याच्या सगळ्या जिल्ह्यांत राष्ट्रवादीच्या किसान मंचातर्फे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठीच्या बैठका झाल्याचे सांगत पवार म्हणाले, कर्जमाफीच्या निर्णयावर सरकार करत असलेल्या टोलवाटोलवीबद्दल सामान्य शेतकऱ्यांत नाराजी आहे. सरकारने आता सांगितल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास ५ नोव्हेंबरला औरंगाबाद येथे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार असून त्या अधिवेशनात सरकारविरोधी संघर्षाची विस्तृत रणनीती आखली जाणार आहे. सनदशीर मार्गाने केल्या जाणाऱ्या या संघर्षात आपण स्वत:देखील सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.    
याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर कोसळलेले असतानाही त्याचा लाभ सर्वसामान्यांना न देण्याच्या केंद्राच्या धाेरणावरही त्यांनी टीका केली. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारांच्या संख्येत झालेली वाढ दर्शवून देण्यासाठी त्यांनी एका इंग्रजी दैनिकाच्या बातमीचा दाखला दिला. या मुद्द्यांवरून सरकारविरोधातही संघर्षाची भूमिका राष्ट्रवादी घेणार असल्याचे ते म्हणाले. सोशल मीडियावर सरकारविरोधात होत असलेल्या टीकेला आळा घालण्यासाठी सायबर शाखेद्वारे चौकशी आणि कारवाईची भीती दाखवून सरकार सर्वसामान्य नागरिकांवर जरब बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कासकर प्रकरणात आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाबाबत विचारले असता ते म्हणाले, आरोपानंतर आमच्या नगरसेवकाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याची खात्री आम्ही करून घेतली आहे. शिवाय जो माणूस सात वर्षे निलंबित होता, काही काळ तुरुंगात होता, अशा अधिकाऱ्याच्या दाव्यांवर कितपत विश्वास ठेवायचा, असे सांगत त्यांनी प्रदीप शर्मांवर अप्रत्यक्ष टीका केली.    
 
बुलेट ट्रेनवरून घेतली फिरकी   
बुलेट ट्रेन किंवा आधुनिक तंत्रज्ञानाला आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करत पवार म्हणाले की, मोदींचे हे स्वप्न महाराष्ट्राला अजिबात लाभदायक नाही. त्याऐवजी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेची स्थिती सुधारावी. तसेच बुलेट ट्रेन आणण्यामागे मोदींची भूमिका काय आहे, हे समजावून देण्यासाठी मोदींच्या भाषणाची एक जुनी ध्वनिचित्रफीत त्यांनी दाखवली, ज्यामध्ये फक्त जगासमोर दिखाऊपणा करण्यासाठी बुलेट ट्रेन आणण्याबाबतचे वक्तव्य मोदींनी केले आहे. तसेच मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया ही घोषवाक्ये अतिशय चमकदार असली तरी त्याची झळ आणि त्यातला पोकळपणा आता जनतेच्या लक्षात येऊ लागल्याचा टोलाही त्यांनी लगावला.  
 
अण्णा हजारे, राणे आणि सरसंघचालकांनाही केले लक्ष्य   
पत्रकार परिषदेनंतरच्या प्रश्नोत्तरादरम्यान पवारांना नारायण राणेंच्या नव्या इनिंगबाबत विचारले असता ते म्हणाले, जे आपल्या नवीन पक्षात स्वत:च्या मुलाला घेऊ शकत नाहीत, अशा पक्षाचा उपयोग काय? तर केरळमध्ये देशद्रोही विचारांचे सरकार असल्याच्या सरसंघचालकांच्या विधानाबाबत विचारले असता, सरसंघचालकांचा शब्द ज्यांच्यासाठी प्रमाण असतो त्यातील कोणीही इथे बसलेले नाही. त्यामुळे त्यांचे विधान आम्ही गांभीर्याने घेत नसल्याचा टोला त्यांनी लगावला, तर अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याबाबत विचारले असता, तीन वर्षे निद्रिस्त असलेले आता काय करतात पाहू, असे वक्तव्य त्यांनी केले.
 
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे काय म्हणाले....
बातम्या आणखी आहेत...