आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ncp Meeting Is Going At Mumbai, Sunil Tatkare Is New State President

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे, पवार पक्षाची पुनर्बांधणी करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करीत राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची एकमताने निवड केली आहे. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी तटकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यामुळे तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवड झाली. दरम्यान, या निवडीने पक्षाध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची नव्याने पुनर्बांधणी करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पदाचा सूत्रे हाती घेताच मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले.
प्रदेश राष्ट्रवादीच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक आज सकाळी 11 वाजता मुंबईत सुरु झाली. या बैठकीच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भास्कर जाधव यांची उचलबांगडी करून प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची निवड केल्याने शरद पवार विधानसभा निवडणुकीआधी फाकरी फिरवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेतृत्व बदलाबाबत काँग्रेस अजूनही निर्णय घेत नसल्याने आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुक स्वबळावर लढावी या मागणीचा रेटा पक्षातून वाढतच चालला आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला. देशात काँग्रेसविरोधाची लाट होती व त्यांच्या सोबत राहिल्यामुळेच राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याचे पक्षाच्या नेत्यांची भावना आहे. मात्र, राष्ट्रवादीचे राज्यातील विविध समाजघटकांकडे दुर्लक्ष झाल्याचे पवारांनी मान्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून कायम सत्तेत असल्याने पक्षाच्या नेत्यांकडून व कार्यकर्त्यांकडून जनतेकडे दुर्लक्ष झाल्याचे पक्षाने मान्य केले आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा झटका बसू नये यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. पवार सध्या मुंबईत तळ ठोकून ते स्वत: सर्व निर्णय घेत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून भास्कर जाधव यांच्याजागी सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्रात आगामी निवडणुका स्वबळावर लढवावी असा आग्रह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनकडून धरला जात आहे. आजच्या बैठकीतही ही मागणी आक्रमकपणे पुढे करून काँग्रेसवरील दबाव वाढविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न राहणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत स्वत: शरद पवार नाराज असून नेतृत्व बदलासाठी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीने काँग्रेसवरील दबाव वाढवला आहे. जागावाटपाचे सूत्र बदलण्याची मागणी पक्षाने याआधीच लावून धरली आहे.