आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Men Boycott Rally Over Rane Son, Pawar Disbands Sindhudurg Unit News In Divya Marathi

राणेंना विरोधासाठी दीपक केसरकरांनी सोडली आमदारकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार, दस्तूरखुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी समजूत काढूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सिंधुदुर्गमधील पदाधिकारी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व कॉँग्रेसचे उमेदवार नीलेश यांचा प्रचार करायला तयार नाहीत. त्यामुळे रविवारी सिंधुदुर्गच्या दौर्‍यावर आलेल्या शरद पवारांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. या कारवाईनंतरही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आपल्या निर्णयापासून तसूभरही ढळले नाहीत. उलट सावंतवाडीतील राष्ट्रवादीचे दीपक केसरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामाच पक्षाकडे पाठवून दिला. ‘काहीही झाले तरी राणेंचा प्रचार नाही म्हणजे नाहीच’ याच भूमिकेचा त्यांनी शरद पवारांसमोरही पुनरुच्चार केल्याने राणे मात्र संकटात सापडले आहेत.

‘आम्हाला कस्पटासमान लेखणार्‍या राणेंचा प्रचार करणार नाही,’ अशी उघड भूमिका आमदार केसरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी यापूर्वीच घेतली होती. पक्षनेतृत्वाकडून हा असहकार मागे घेऊन प्रचारात सहभागी व्हा, असे आदेश दिल्यानंतरही केसरकर आणि त्यांचे सर्मथक राणेंच्या प्रचारात सहभागी होत नव्हते. उलट जिल्हातील बहुसंख्य पदाधिकार्‍यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. इतकेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या अजित पवारांच्या सभेवरही त्यांनी बहिष्कार टाकला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी केसरकर यांना दोनच दिवसांपूर्वी याबाबत शरद पवार यांनी मुंबईत बोलावून घेतले होते. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नव्हता.

आधीच राजीनामा दिला
रविवारी शरद पवार हे राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत पोहोचले असतानाही राष्ट्रवादीचे पदाधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत पवारांच्या आदेशाने पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. जिल्हाध्यक्ष बाळ भिसे यांना पदावरून हटवण्यात आले. त्यावर ‘पक्षाने माझ्यावर आज कारवाई केली, पण त्या आधीच मी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता,’ असे भिसे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे आपल्यामुळे पक्षाध्यक्षांची अडचण होऊ नये म्हणून आपण सकाळीच आमदारकीचा राजीनामा दिल्याचे केसरकर यांनी सांगितले.

आज ठरणार दिशा
आपले पवारांशी बोलणे झाले होते. त्यांनी आपल्याला सभेला हजर राहण्यास सांगितले होते. पण मी जर व्यासपीठावर गेलो तर चुकीचा संदेश जाईल असे आपण पवारांना सांगितल्याचे केसरकर म्हणाले. सोमवारी याबाबत आपण पदाधिकार्‍यांशी चर्चा करून पुढची भूमिका ठरवू असेही ते म्हणाले.

नोटीस बजावणार
केसरकरांनी आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी तडकाफडकी हा राजीनामा मंजूर करता येणार नाही. पक्षाच्या घटनेनुसार केसरकरांना आधी कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येईल. त्यांच्या खुलाशानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा खुलासा शरद पवारांनी केला.