आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षे निवडणूक बंदी घालून भाजप राजकीय सूड घेतोय- मुश्रीफांची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/कोल्हापूर- अनियमित आणि बेकायदेशीर कामकाजामुळे सहकारी बँक अडचणीत येण्यास कारणीभूत ठरलेल्या संचालकास बँकेची निवडणूक लढविण्यास पुढील 10 वर्षे बंदी घातल्यानंतर भाजप राजकीय सूड घेतोय अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व कोल्हापूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली आहे. कोल्हापूर महापालिकेत पराभव झाल्याने सहकारमंत्री चंद्रकांत पाटील राजकीय आकसातून निर्णय घेत असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
या निर्णयाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावू असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे. हसन मुश्रीफ यांनीही तीच री ओढली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाली असून हसन मुश्रीफ यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र सरकारच्या निर्णयाने त्यांची निवड रद्द होणार असल्याने त्यांचा तीळपापड झाला आहे.
भ्रष्टाचार व अनियमितता आढळून आल्यामुळे बरखास्त करण्यात आलेल्या जिल्हा तसेच राज्य सहकारी बँकेच्या सुमारे 77 संचालकांना पुढील 10 वर्षे निवडणुका लढवण्यास परवानगी नाकारण्याच्या निर्णयावर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. याबाबतचा वटहुकूम लवकरच काढण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिकसह राज्यातील सुमारे 11 बँकांमध्ये पुन्हा निवडून आलेल्या संचालकांनाही बरखास्तीला सामोरे जावे लागेल. यात विजयसिंह मोहिते-पाटील, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे.
नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन करणे, नऊ साखर कारखान्यांना 331 कोटींचा बेकायदा कर्जपुरवठा, कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही 478 कोटींची थकबाकी, खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री आदी आरोप राज्य बॅंकेच्या संचालकांवर आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह माेहिते पाटील, दिलीप देशमुख, दिलीप सोपल, राजेंद्र शिंगणे, हसन मुश्रीफ, जगन्नाथ पाटील, यशवंतराव गडाख, खासदार आनंदराव अडसुळ, रजनीताई पाटील, पांडुरंग फुंडकर, माणिकराव कोकाटे, जयंत पाटील, मीनाक्षी पाटील यांना पुढील 10 वर्षे बॅंकेची निवडणूक लढवण्याचा मार्ग बंद झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...